इंग्रजांनी सुरू केलेल्या शाळेच्या पटांगणावर राजकारण्यांची नजर; व्यावसायिक गाळे बांधण्याचा घाट

author img

By

Published : Aug 28, 2021, 9:31 AM IST

व्यावसायिक गाळे बांधण्याचा घाट

शाळेच्या प्रांगणात सुरू असलेल्या व्यवसायिक गाळ्यांना विरोध करण्यासाठी या शाळेचे माजी विद्यार्थी एकवटलेले आहेत. देश-परदेशात असलेले हे सर्व विद्यार्थी आता एकत्रित आले असून सुरुवातीला निवेदनाच्या माध्यमातून काम थांबवण्याचे प्रयत्न करत आहेत.

भंडारा - पंधराशे पटसंख्या असलेली आणि शंभर वर्षापेक्षा अधिक जुनी असलेली भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध जिल्हा परिषद लालबहादूर शाळेच्या पटांगणावर सध्या व्यावसायिक गाळे बांधण्याचे काम सुरु करण्यात आलेले आहे. हे बांधकाम नियम धाब्यावर ठेवून सुरू करण्यात आले असून याविषयी कोणताही ठराव शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला नसल्याचे माजी शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर यांनी सांगितले. शाळेतील पटांगणात सुरू असलेल्या व्यावसायिक गाळे बांधकाम थांबावे, यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी एकवटले असून त्यांच्या माध्यमातून न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे.

इंग्रजांनी सुरू केलेल्या शाळेच्या पटांगणावर राजकारण्यांची नजर

इंग्रजांनी सुरू केली होती शाळा

स्वातंत्र्यापूर्वी भारतात अधिराज्य गाजवणाऱ्या इंग्रजांच्या अधिकाऱ्यांपैकी एक मन्रो या अधिकाऱ्याने त्याच्या कार्यकाळात 1904 मध्ये भंडारा जिल्ह्यात ही शाळा सुरू केली होती. जिल्ह्यातील लोक शिक्षित व्हावे या उदात्त हेतूने ही शाळा सुरू करण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर या शाळेची जबाबदारी जिल्हा परिषदेला देण्यात आली. 1968 मध्ये या शाळेचे नामांतरण करून लालबहाद्दूर शास्त्री शाळा असे करण्यात आले. ही शाळा अगदी सुरुवातीपासून शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य आहे.

व्यावसायिक गाळे बांधण्याचा घाट
व्यावसायिक गाळे बांधण्याचा घाट

पंधराशे पटसंख्या आणि विदर्भातून मेरीट देणारी शाळा

या शाळेचा शैक्षणिक दर्जा उत्कृष्ठ असल्याने या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी जिल्हाभरातूनच नाही तर बाहेरील विद्यार्थी शिकायला येत असत. विदर्भातील पहिली विद्यार्थिनी या शाळेचीच आहे. या शाळेतून जवळपास एक लाखाच्या वर विद्यार्थी शिकून देश-परदेशात मोठ-मोठ्या पदावर कार्यरत आहेत.

खेळातही शाळा नेहमीच अव्वल

लालबहादूर शास्त्री शाळेतील विद्यार्थी केवळ अभ्यासतच नाही तर खेळातही अव्वल आहेत. लॉकडाऊनपूर्वी झालेल्या शालेय स्पर्धेत या शाळेतील तीन विद्यार्थी हे संपूर्ण भारतातून अव्वल आलेले आहेत. खो-खो, कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॉल बॅटमिंटन, तलवारबाजी अशा सर्व खेळांचे प्रशिक्षण या शाळेतून दिले जाते.

शाळेच्या प्रांगणावर गाळे बांधकामाचा घाट

2018 मध्ये तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी एक ठराव घेऊन लालबहादूर शास्त्री शाळेच्या प्रांगणात 71 व्यवसायिक गाळे बांधकामाची परवानगी दिली. हे करतांना बरेच नियम पायदळी तुडवले गेले. शाळेच्या प्रांगणात बांधकाम करण्यासाठी शिक्षण समितीमार्फत एक ठरावा घ्यावा लागतो. तो घेतलाच गेला नाही. शासकीय नियमाप्रमाणे 500 विद्यार्थ्यांमागे दोन हजार चौरस मीटर येवढे खेळाचे मैदान असावे. म्हणजेच लालबहादूर शास्त्री शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या पाहता सहा हजार चौरस मीटर पटांगण असायला हवे. मात्र सध्या शाळेतील पटांगणावर बांधल्या जात असलेल्या गाळ्यामुळे पटांगण नावापुरतेच उरले आहे. त्यामुळे भविष्यात या पटांगणावर खेळाचे सराव करता येणार नाही. या पटांगणावर बीओटी तत्वावर बांधल्या जाणाऱ्या गाळ्यामुळे जिल्हा परिषदेला 25 हजार रुपये मासिक उत्पन्न मिळणार आहे. याच्या माध्यमातून ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबविणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगितले जात आहे. तर या बांधकामाविषयी तत्कालीन शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर यांना विचारले असता, आम्ही असा कोणताही ठराव घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले. या बांधकामाविषयी मला अजिबात कल्पना नसल्याचेही त्यांनी सांगितले.

पटांगणावर राजकारण्यांची नजर
पटांगणावर राजकारण्यांची नजर

माजी विद्यार्थी एकवटले

शाळेच्या प्रांगणात सुरू असलेल्या व्यवसायिक गाळ्यांना विरोध करण्यासाठी या शाळेचे माजी विद्यार्थी एकवटलेले आहेत. देश-परदेशात असलेले हे सर्व विद्यार्थी आता एकत्रित आले असून सुरुवातीला निवेदनाच्या माध्यमातून काम थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यपालन अधिकारी हे दुर्लक्ष करीत असल्याने हे बांधकाम कशा पद्धतीने अवैधरित्या सुरू करण्यात आले असून त्याला तात्काळ थांबवून या शाळेचे भवितव्य अबाधित राहावे यासाठी न्यायालयात दाद मागणार आहेत. आम्ही न्यायालयातून नक्कीच जिंकू आणि आमची शाळा अबाधित ठेवू असा विश्वास या माजी विद्यार्थ्यांचा आहे. तर याविषयी कोणीही अधिकारी बोलायला तयार नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.