आमदार-खासदारांमध्ये श्रेयवादावरून रस्सीखेच, भंडाऱ्यात भुयारी गटार योजना आणल्याचा दोघांचा दावा

author img

By

Published : Oct 5, 2021, 9:46 PM IST

Updated : Oct 5, 2021, 10:14 PM IST

file photo

आमदार नरेंद्र भोंडेकर आणि खासदार सुनील मेंढे यांच्यामध्ये श्रेयवादावरून रस्सीखेच सुरू आहे. भंडारा नगरपालिकेसाठी 116 कोटी रूपयांच्या भुयारी गटार योजना मंजूर करून आणण्याचे काम आम्हीच केलं हे दाखवण्यासाठी दोन्ही नेत्यांनी शहरात सर्वत्र बॅनर लावले आहेत.

भंडारा - पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि भंडारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष तथा खासदार सुनील मेंढे यांच्यामधील श्रेयवादावरून सुरू असलेली रस्सीखेच सध्या नागरिकांच्या चर्चेचा विषय बनलेला आहे. भंडारा नगर परिषदेसाठी 116 कोटी रूपयांच्या भुयारी गटार योजना मंजूर करून आणण्याचे काम आम्हीच केलं हे दाखवण्यासाठी दोन्ही नेत्यांनी शहरात सर्वत्र बॅनर लावले आहेत. तर तुम्ही काम आणल्याचे सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या, असे आव्हान आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी खासदार यांना दिले आहे.

'ई टीव्ही भारत'ने घेतलेला आढावा
  • त्यांनी केवळ कागदपत्र पुरवले मंजूर मी करून आणले -आमदार नरेंद्र भोंडेकर

भुयारी गटार योजनेसाठी लागणारे कागदपत्र हे नगरपालिकेतर्फे पुरवण्यात आले. सुनील मेंढे हे नगराध्यक्षसुद्धा असल्याने त्यांनी हे कागदपत्र पुरवले. मात्र, त्यानंतर या योजनेची तांत्रिक परवानगीपासून तर प्रत्येक गोष्टीची मंजुरी मिळून आणण्याचे काम मी केले असल्याचा दावा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला आहे. कोरोना कालावधीत शासनाने सर्व मोठ्या योजनांना मंजुरी नाकारली होती. मात्र, विशेष बाब म्हणून आमची ही योजना मंजूर करावी यासाठी मी एकनाथ शिंदे यांना पत्र दिले होते. त्या पत्राची दखल घेत एकनाथ शिंदे यांनी योजना मंजूर करून 167 कोटी पैकी पहिल्या टप्प्यातील 116 कोटी रुपयांना मंजुरी दिली, असे आमदार भोंडकर यांनी सांगितले.

हेही वाचा - Lakhimpur Kheri Violence : केंद्र आणि योगी सरकारचा विरोधकांकडून निषेध

  • लग्न कोणाचे आणि नाचतो कोण?

आम्हाला या योजनेची मंजुरी मिळताच आम्ही ती सोशल मीडियावर टाकली. त्यामुळे त्याचं श्रेय मिळवे म्हणून खासदार यांनी लगेच बॅनर लावून घेतले. त्यांना जर कामाचे श्रेय पाहिजे असल्यास त्यांनी आम्हाला सांगावे आम्ही त्यांना स्वतःहून या कामाचे श्रेय देऊ. मात्र योजना आम्ही मंजूर करून आणली आणि जर त्यांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतील तर हा प्रकार म्हणजे लग्न कोणाचे आणि नाचतोय कोण असा होईल. त्यांनी त्यांच्या केंद्रातून योजना आणून त्याचे श्रेय नक्की मिळवावे. मात्र, आम्ही खेचून आणलेल्या योजनेचे श्रेय मिळवणे हे खासदार साहेबांना अशोभनीय आहे, असे आमदार भोंडेकर यांनी सांगितले.

  • भोंडकर आमदार नव्हते तेव्हापासूनच ही योजना आणण्यासाठी पत्रव्यवहार सुरू - खासदार - सुनील मेंढे

मी भंडारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरलो, तेव्हाच शहरासाठी विशेष पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गटार योजना आणणार असल्याची घोषणापत्रात जाहीर केले होते. भुयारी गटार योजना सुरू होण्याअगोदर नळ योजना पूर्ण होणे गरजेचे असते, त्यामुळे सुरुवातीला नळ योजना मंजूर करून आणली आणि त्यानंतर या भुयारी गटार योजनेसाठी सर्व पत्र व्यवहार पूर्ण केले. मात्र, कोरोना कालावधीमध्ये कोणत्याही नवीन योजनांना मंजुरी न देण्याचे पत्र महाराष्ट्र शासनाने काढले होते आणि त्यामुळेच याला मंजुरी मिळाली नाही. आत्ता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने महाराष्ट्रातील जवळपास 15 ते 16 ठिकाणी नवीन प्रकल्पाला मंजुरी मिळाली असल्याने त्यात भंडारा शहराला भुयारी गटार योजना मंजूर झाली आहे. योजना अमलात आणण्यासाठी जेव्हा पत्रव्यवहार सुरू झाला त्या काळात आमदार नरेंद्र भोंडेकर हे आमदार सुद्धा नव्हते. त्यांना या योजनेविषयी साधी कल्पनासुद्धा नव्हती. अगदी सुरुवातीपासून तर योजना मंजूर करण्यापर्यंत सर्वच व्यवहार आम्ही केले आहेत. तरी देखील आमदार भोंडकर ही योजना मीच आणली असे मिरवत असतील तर यापेक्षा हास्यास्पद काय असेल, असं नगराध्यक्ष तथा खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले आहे.

  • योजना मंजूर करून आणल्याचे सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्यावा -

आमदार आणि खासदार यांनी योजना मंजूर करून घेतल्याचे बॅनर शहरात लागल्यानंतर संतापलेल्या आमदारांनी खासदार सुनील मेंढे यांना उघड आव्हान देत योजना तुम्ही मंजूर करून आणली हे सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या असे आव्हान खासदारांना केले आहे. भुयारी गटार योजनेला केवळ मंजुरी मिळाली. प्रत्यक्षात काम सुरू होण्यासाठी आणि पूर्ण होण्यासाठी अजून बराच विलंब आहे. तरीही आमदार आणि खासदार यांचा सुरु असलेला श्रेयवाद म्हणजे निवड उतावीळपणा असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत.

हेही वाचा - ऑनलाइन बुकिंग करून येणाऱ्या भाविकांनाच मिळणार साईदर्शन, शनिदर्शनासाठी ऑफलाइन पद्धत; वाचा नियमावली

Last Updated :Oct 5, 2021, 10:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.