नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पात प्रथमच आढळला दुर्मिळ ‘बघिरा’

author img

By

Published : Jul 6, 2021, 12:54 PM IST

Updated : Jul 6, 2021, 1:35 PM IST

दुर्मिळ ‘बघिरा’

विदर्भातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नवेगाव भागात काळा बिबट्या आढळला आहे. किपलिंगच्या ‘जंगल बूक’ मध्ये ‘बघिरा’ म्हणून त्याचा उल्लेख केला आहे. डॉ. बिलाल हबीब यांनी आपल्या ट्वीटरवरून शेअर केलेल्या चित्रात एनएनटीआर लँडस्केपचा उल्लेख केला आहे.

भंडारा - विदर्भातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नवेगाव भागात काळा बिबट्या आढळला आहे. किपलिंगच्या ‘जंगल बूक’ मध्ये ‘बघिरा’ म्हणून त्याचा उल्लेख केला आहे. अतिशय दुर्मिळ असलेल्या काळ्या बिबट्याचे सोबतिणीसह चित्र सर्वप्रथम भारतीय वन्यजीव संस्थेत वैज्ञानिक असलेले डॉ. बिलाल हबीब यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडल वर शेयर केले आहे. या चित्रात काळ्या रंगाचा बिबट्या आणि त्याच्या सोबत जंगलात विहार करणारी मादी एकत्र दिसत असून ही चित्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

कॅमेरा ट्रॅपिंग मध्ये आढळला बघिरा

नवेगाव नागझिरा टायगर रिझर्व्ह (एनएनटीआर) प्रकल्पातील कॅमेरा ट्रॅपिंगमधला हा डेटा असून तो डेहराडून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला पाठविण्यात आला आहे. डॉ.बिलाल हबीब यांनी आपल्या ट्वीटरवरून शेअर केलेल्या चित्रात एनएनटीआर लँडस्केपचा उल्लेख केला आहे. ही नर-मादी जोडी नेमक्या कोणत्या ठिकाणी आढळली याचा उल्लेख मात्र त्यांनी टाळला आहे. "एनएनटीआर फील्ड स्टाफ कडून कॅमेरा ट्रॅप मोहीम राबविली जाते आणि माहिती विश्लेषणासाठी डब्ल्यूआयआयकडे पाठविली जाते,” असे स्पष्टीकरण एनएनटीआर क्षेत्र संचालक सीएफ मणिकंद रामानुजम यांनी दिले.

काळ्या बिबट्याबद्दल माहिती

“अधिवास नष्ट होणे आणि शिकार केल्यामुळे भारतीय बिबट्या एक असुरक्षित प्रजाती म्हणून सूचीबद्ध आहेत. मेलेनिस्टिक (काळसर) बिबट्यांचा एएसआयपी रंग ठरविणाऱ्या जनुकात (ज्याचा संबंध त्वचे / डोळा / केसांच्या रंगद्रव्याशी संबंधित आहे) बदल होऊन असे उदाहरण पाहावयास मिळते. एनएनटीआर मध्ये आढळलेल्या बिबट्यामध्ये काळा रंग फिकट असून जनुक अभिव्यक्तीची समस्या असू शकते. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे डॉ. बिलाल हबीब यांनी ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या चित्रामध्ये ‘रस्टी स्पॉटेड कॅट’ आपल्या दोन पिलांसह दिसत आहे. ती मांजरीची प्रजाती झाडांवर दिसून येणारी आणि फारच क्वचितच जमिनीवर पाहिली जाते. नवेगाव येथील उत्कृष्ट जैव विविधतेचे ही उत्तम उदाहरण आहे.,” असे भंडारा येथील मानद वन्यजीव रक्षक नदीम खान यांनी सांगितले आहे.

या अगोदर आढळले होते ताडोबा आणि पेंचमध्ये

कर्नाटक राज्यातील काबिनी अभयारण्यात पाच वर्षांपूर्वी अशाच एक काळ्या रंगाच्या बिबट्याची नर- मादी जोडी सर्वांत पहिल्यांदा आढळून आली होती. साया ( नर) आणि क्लिओ (मादी) ही जोडी त्यावेळी प्रसिद्धीच्या झोतात आली होती. वाईल्डलाईफ फोटोग्राफर शाज जंग यांनी तयार केलेली विशेष डॉक्युमेंट्रीही बरीच गाजली होती. 2019-20 मध्ये विदर्भातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासोबतच पेंच व्याघ्र प्रकल्पातही एकट्याने फिरणारे काळे बिबटे आढळले होते. मात्र नवेगाव- नागझिरा अभयारण्यात काळ्या रंगाच्या बिबट्या सोबत मादी आढळण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.

नवेगाव येथील फोटो
“सदर बिबट्याचा फोटो नवेगाव भागातील आहे. जैवविविधता विपुल प्रमाणात असून अनेक दुर्मिळ प्रजाती या परिसरातून आढळून आले आहेत,” असे गोंदिया येथील मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर यांनी सांगितले. “एक चांगली बातमी असून यामुळे नागझिरा आणि नवेगाव येथील इको टूरिझमला खूप चालना मिळेल. हीच माहिती मागील आठवड्यात मिळाली असती तर एनएनटीआरच्या उपासमार घडणाऱ्या गाईड, जिप्सी आणि इतर निसर्ग पर्यटनावर अवलंबून असलेल्या परिवारांना किमान रोजगार तरी मिळाला असता,” असे पिटेझरी येथे वास्तव्यास असलेले ‘सखा नागझिरा’ चे लेखक व निसर्गतज्ञ किरण पुरंदरे यांनी सांगितले. “नवेगाव परिसरात विशेष लक्ष द्यायची गरज असून या प्रजातीच्या रक्षणासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यात यावी,” असे भंडारा येथील मानद वन्यजीव रक्षक शाहिद परवेज खान यांनी सांगितले.
या चित्रामुळे बिबट्याच्या जोडीमुळे 656.36 चौरस किलोमीटर पसरलेले नवेगाव- नागझिरा अभयारण्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या बिबट्याच्या जोडीचा पत्ता लावण्यासाठी वन्यप्रेमी उत्सूक आहेत. परंतु, पावसाळ्यामुळे जंगल सफारी बंद पडल्याने काही जण निराश झाले आहेत.
हेही वाचा - शिस्तीसाठीच निलंबन, नाहीतर सदनात दंगली होतील - संजय राऊत

Last Updated :Jul 6, 2021, 1:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.