विरोधकांनी राजकारण करू नये; केंद्रातून आणखी विकासकामे आणावीत - धनंजय मुंडे

author img

By

Published : Jul 4, 2021, 8:15 AM IST

Oppos should not politicize development work but bring more development work from the center - Dhananjay Munde

परळी शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू असल्यामुळे काही ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. खोदलेले व पडलेले सर्व खड्डे बुजवून परळी शहर येत्या तीन महिन्यांच्या आत खड्डे व धुळमुक्त होईल, असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी परळीकरांना दिले आहे.

परळी (बीड) - नगर पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन विरोधकांनी विकासकामांत राजकारण करू नये, उलट आपल्या हाती असलेल्या केंद्रीय सत्तेचा आणखी विकासकामे परळीत आणण्यासाठी वापर करावा, असा खोचक टोला पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नाव न घेता पंकजा मुंडे यांना लगावला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या परळी शहर बायपास या रस्त्याच्या चौपदरी डांबरीकरणाचे आणि परळी ते धर्मापुरी रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरण कामाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

विरोधकांनी विकासकामांत राजकारण करू नये तर केंद्रातून आणखी विकासकामे आणावीत

तीन महिन्यांत परळी होणार खड्डे आणि धुळमुक्त -

परळी शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू असल्यामुळे काही ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. खोदलेले व पडलेले सर्व खड्डे बुजवून परळी शहर येत्या तीन महिन्यांच्या आत खड्डे व धुळमुक्त होईल, असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी परळीकरांना दिले आहे. परळी शहर बायपास, परळी ते धर्मापुरी रस्ता या दोन कामांना शनिवारी सुरुवात झाली. परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल, परळी ते तेलगाव रस्त्याचीही निविदा प्रक्रिया पूर्ण होत आहे, असे त्यांनी सांगितले.

Oppos should not politicize development work but bring more development work from the center - Dhananjay Munde
धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन

आम्ही दिलेल्या शब्दाला जागणारे लोक -

विधानसभा निवडणुकीत परळीच्या जनतेला येत्या पाच वर्षात त्यांचे उत्पन्न दुप्पट होईल इतका विकास करून दाखवू. 'आम्ही दिलेल्या प्रत्येक शब्दाला जागणारे लोक आहोत', अशी आठवणही मुंडेंनी उपस्थितांना करून दिली. या दोन्ही औपचारिक भूमिपूजन समारंभास आमदार संजय दौंड, जि.प. अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, नगराध्यक्षा सरोजनी हलगे, जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांसह मान्यवर उपस्थित होते.

एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग आणणार -

अनेक वर्षांपासून पाहिलेले पंचतारांकित एमआयडीसीचे काम पूर्णत्वाकडे घेऊन जात आहोत. नोटिफिकेशन निघाले, 35 हेक्टर जागेची प्रत्यक्ष मोजणी पूर्ण झाली. आता या जागेत नवनवीन गुंतवणूकदार आणून इथे उद्योगांना चालना देऊ. या भागात नवीन रोजगार निर्मिती करू असे ते यावेळी म्हणाले.

सोलारचे प्लांट सुरू करू -

थर्मल पावर प्लांटमधील काही संच कोळसा व अन्य अडचणींमुळे बंद करण्यात आले आहेत. मात्र, आपण ऊर्जा विभागाशी याबाबत चर्चा केली आहे. तितक्याच क्षमतेचे सोलार प्लांट उभारण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोरडवाहू शेती करणारा शेतकरी बागायतदार व सधन होईल -

मलकापूर ते वाका या भागातील 11 साठवण तलावांच्या पाणी उपलब्धीचा मार्ग मोकळा झाला आहे. 11 साठवण तलावांच्या माध्यमातून या भागातील आणखी 35 टक्के क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या भागातला कोरडवाहू शेती करणारा शेतकरी बागायतदार व सधन होईल, असे ते म्हणाले.

तर परळीही नांदेड-लातूर प्रमाणे विकसित दिसेल

परळी मतदारसंघातील रखडलेल्या प्रत्येक विकासकामांना येत्या काळात गती देऊन दिलेला पूर्ण शब्द करू. परळी शहर व तालुका समृद्ध करुन इथल्या प्रत्येक सामान्य व्यक्तीचे उत्त्पन्न वाढविणे हे आपले उद्दिष्ट आहे. त्यापासून मी कधीही स्वतःला वेगळे करू शकत नाही, असे म्हणतच परळीचा लातूर व नांदेड शहरांच्या धर्तीवर विकास करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही मुंडे यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.