वक्फ बोर्डच्या जमीन अपहार प्रकरणात बडतर्फ उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक

author img

By

Published : Oct 10, 2021, 7:22 AM IST

उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक

आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील वक्फ बोर्डाची जमीन मदतमाष दाखवून खालसा करीत भलत्यांच्याच नावे करण्यात आली होती. सुमारे ५६ एकर जमिनीच्या गैरव्यवहाराचे हे प्रकरण समोर आल्यानंतर वक्फ अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणात जुलै २०२१ मध्ये आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपींची संख्या वाढली आणि महसूल अधिकारी देखील आरोपी म्हणून समोर आले.

बीड - आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील वक्फ बोर्डाची जमीन भलत्यांच्याच नावे करण्यात आल्याच्या प्रकरणात जमीन खालसाचे आदेश देणारा तत्कालीन भूसुधार उपजिल्हाधिकारी आणि सध्या बडतर्फ करण्यात आलेला उप जिल्हाधिकारी डॉ. एन आर शेळकेला अखेर अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी त्याला औरंगाबाद येथून अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १५ आरोपी समोर आले असून आणखी एक उपजिल्हाधिकारी देखील पोलिसांच्या रडारवर आहेत. आष्टी तालुक्यातील देवस्थान जमीन घोटाळ्यात आरोपींची अटक होत नसल्याची तक्रार आ. बाळासाहेब आजबे यांनी थेट पोलीस महासंचालकांकडे केल्यानंतर आता या प्रकरणात ही कारवाई झाली आहे.

आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील वक्फ बोर्डाची जमीन मदतमाष दाखवून खालसा करीत भलत्यांच्याच नावे करण्यात आली होती. सुमारे ५६ एकर जमिनीच्या गैरव्यवहाराचे हे प्रकरण समोर आल्यानंतर वक्फ अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणात जुलै २०२१ मध्ये आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सुरुवातीला केवळ दोन आरोपी होते, नंतर मात्र तपासादरम्यान आरोपींची संख्या वाढली आणि महसूल अधिकारी देखील आरोपी म्हणून समोर आले. या प्रकरणात उप जिल्हाधिकारी पदावरून बडतर्फ करण्यात आलेल्या डॉ. एन आर शेळके याला शनिवारी औरंगाबाद येथून अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या पथकाने ही अटक केली आहे. डॉ. एन आर शेळके बीड येथे भूसुधार उपजिल्हाधिकारी असताना त्याच्याच स्वाक्षरीने सदर जमिनीचे खालसा आदेश झाल्याचे समोर आले असून कोणत्याही संचीकेशिवाय बोगसपणे हे आदेश काढल्याचे समोर आले आहे.

जामिनावर होती सुनावणी , त्यापूर्वीच झाली अटक -

डॉ. एन.आर शेळकेचा अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वी जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. मात्र त्यापूर्वीच शेळकेला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. शेळकेंच्या रूपाने एक मोठा मासा पोलिसांच्या हाती लागला आहे.

कोण आहे शेळके? -

डॉ. एन आर शेळकेची महसूल विभागातील सारीच कारकीर्द वादग्रस्त राहिलेली आहे. शेळकेवर अनेक ठिकाणी अधिकाराचा गैरवापर केल्याच्या तक्रारी होत्या . त्यात त्याची विभागीय चौकशी देखील झालेली आहे. बीडमध्ये शेळके जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याचवेळी त्याच्याकडे काही काळ उपजिल्हाधिकारी सामान्य म्हणून भूसुधारचा अतिरिक्त पदभार होता. जिल्हा पुरवठा अधिकारी असतानाच कार्यालयातच लाच घेतल्या प्रकरणी शेळकेला एसीबीने पकडले होते. नंतर उप जिल्हाधिकारी झालेल्या शेळकेला सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

आणखी एक उपजिल्हाधिकारी रडारवर -

या प्रकरणात बीडमध्ये भूसुधार उपजिल्हाधिकारी म्हणून वादग्रस्त ठरलेले आणि नुकतीच बदली झालेले उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव याला देखील आरोपी करण्यात आले आहे. आघाव सध्या पोलिसांच्या रडारवर आहे . प्रकाश आघाव याच्यावर भूसुधारशी प्रकणात गैरव्यवहाराचा ठपका असून बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या विरोधात अहवाल दिल्यानंतर त्याची बदली झाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.