औरंगाबाद - पैठण तालुक्यातील जांभळी तांडा गावातील राम टेकडीवर असलेल्या राम मंदिर परिसरात महाराज आणि अज्ञात नागरिकांमध्ये गाई वरून वाद निर्माण झाला होता. याच वादातून गणेश गिरी महाराजांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी शनिवारी बिडकीन पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्यानंतर पोलिसांनी जवळपास 14 संशयितांना अटक केली आहे.
महाराजांवर देखील दाखल झाला गुन्हा...
जांभळी तांडा येथे टेकडीवर महाराजांवर हल्ला झाला. या हल्ल्याचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये गणेश गिरी महाराज दोन्ही हातांमध्ये तलवारी घेऊन शिवीगाळ करत असल्याचं दिसून येत आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून महाराजांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी बिडकीन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात महाराज जखमी झाले असून, त्यांच्यावर औरंगाबादमधील घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
महाराजांच्या तक्रारीनंतर 14 संशयित ताब्यात...
जांभळी तांडा येथील गणेश टेकडीवर मंदिरात राहणाऱ्या, गणेश गिरी महाराजावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये महाराज गंभीररित्या जखमी झाले आहेत. महाराजांच्या पायाला, दोन्ही हातांना आणि डोक्याला जखमा झाल्या होत्या. हल्ला होत असताना गावकरी महाराजांच्या मागे हातात दगड आणि काठ्या घेऊन लागले होते. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या महाराजांनी बिडकीन पोलिसात आपली तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर 14 संशयित आरोपींना बिडकीन पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.
काय आहे नेमकी घटना?
जांभळीजवळ मेहरबान नाईक तांडा परिसरात राम टेकडीवर असलेल्या राम मंदिरात एकादशी निमित्ताने निलजगाव येथील भाविक आले होते. दर्शन झाल्यानंतर दिंडीतील महिला आणि बालक टेकडीवर जेवण करण्यासाठी बसले असता, महाराजांच्या मालकीची एक गाय महिलांच्या अंगावर गेली. त्यामुळे महिला भयभीत झाल्या होत्या. त्यावेळेस भाविकांनी गाईला हाकलून लावले होते. याच कारणावरून महाराज आणि भाविकांमध्ये वाद झाला होता. वाद विकोपाला गेल्यावर गणेश गिरी महाराजांनी तलवार काढून गावकऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी महाराजांवर दगडफेक करायला सुरुवात केली होती, आणि त्यातच महाराज हे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी बिडकीन पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार 14 संशयितांना अटक करण्यात आली असून पुढील तपास बिडकीन पोलीस करत आहेत.