मुख्यमंत्र्यांचे हस्ते पैठणमधील संत पीठाचे लोकार्पण; जाणून घ्या, संतपीठाचा 40 वर्षांचा प्रवास कसा झाला?

author img

By

Published : Sep 18, 2021, 12:48 PM IST

sant peeth

मराठवाडा विकास 42 कलमी कार्यक्रमांतर्गत पैठण येथील संतपीठाचा समावेश करण्यात आल्याची घोषणा तत्कालिन मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांनी 23 जानेवारी 1981 रोजी केली होती. यानंतर संतपीठाचे स्वरूप, शिफारसी व अहवाल देण्यासाठी दिवंगत बाळासाहेब भारदे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या बारा जणांच्या समितीचीही 23 मार्च 1981ला शासनाकडून स्थापना करण्यात आली. संतपीठ शासनाने त्वरित सुरू करावे, म्हणुन पैठण येथे 11 जुलै 1982ला मराठवाडा पातळीवरील झालेल्या मेळाव्यात एकमताने ठराव संमत करण्यात आला.

पैठण (औरंगाबाद) - तीर्थक्षेत्र पैठण येथील संतपीठाचे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने 17 सप्टेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते औरंगाबाद येथून ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. यानंतर रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, संतपीठ समन्वय प्रविण वक्ते, विलासबापु भुमरे, माजी मंत्री अनिल पटेल, नंदलाल काळे, बाजीराव बारे, रखमाजी महाराज नवले, विठ्ठल चनघटे शास्री, गणेश मडके, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवण लोहियांसह वारकरी भाविकांची उपस्थिती होती. 40 वर्षांच्या प्रदिर्घ कालावधीनंतर 17 सप्टेंबरला या संतपीठाचा लोकार्पणसोहळा पार पडला. येथे अभ्यासक्रमाला लगेचच सुरुवात होणार असल्याने वारकरी व पैठणवासियांनी समाधान व्यक्त केले.

संतपीठाचा 40 वर्षांचा प्रवास कसा झाला याबाबत ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा -

मराठवाडा विकास 42 कलमी कार्यक्रमांतर्गत पैठण येथील संतपीठाचा समावेश करण्यात आल्याची घोषणा तत्कालिन मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांनी 23 जानेवारी 1981 रोजी केली होती. यानंतर संतपीठाचे स्वरूप, शिफारसी व अहवाल देण्यासाठी दिवंगत बाळासाहेब भारदे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या बारा जणांच्या समितीचीही 23 मार्च 1981ला शासनाकडून स्थापना करण्यात आली. संतपीठ शासनाने त्वरित सुरू करावे, म्हणुन पैठण येथे 11 जुलै 1982ला मराठवाडा पातळीवरील झालेल्या मेळाव्यात एकमताने ठराव संमत करण्यात आला. संतपीठ सुरू करावे म्हणुन तत्कालिन केंद्रीय मंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्याकडून 22 जानेवारी 1983 ला महाराष्ट्र शासनाकडे आग्रह करण्यात आला. भारदे समितीने संतपीठाचा अंतिम अहवाल 20 मार्च 1990ला शासनास सादर केला.

यानंतर पैठण येथील ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी समारोह कार्यक्रमात त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडून 31 जानेवारी 1991ला पैठण येथेच संतपीठ उभारले जाईल, अशी लाखो भाविकांच्या उपस्थितीत पुनश्च घोषणा करण्यात आली. पैठण येथील ज्ञानेश्वर उद्यान परिसरात 17 एकर जमीन संतपीठासाठी फेब्रुवारी 1991मध्येच पाठबंधारे विभागाने सांस्कृतिक विभागाच्या ताब्यात दिली. सन 1991-92च्या अर्थसंकल्पात संतपीठासाठी शासनाने एक कोटीचा निधीही उपलब्ध करून दिला. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडुन 17 डिसेंबर 1993ला पैठण येथील संतपीठ सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.

मराठवाड्याचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोविंदभाई श्रॉफ यांनी 25 डिसेंबर 1993ला पैठण येथील संतपीठ त्वरित सुरू करावे, अशी मागणी केली. मराठवाडा विकासाच्या 42 कलमी कार्यक्रमांतर्गत पैठण जिल्हा औरंगाबाद येथे संतपीठाची स्थापना करण्याचा शासननिर्णय दि. 6 डिसेंबर 1994 अन्वये झाला. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीही पैठण येथील संतपीठाच्या प्राथमिक कामासाठी 20 लाख रुपये उपलब्ध करून दिले जातील, अशी घोषणा 19 डिसेंबर 1995ला औरंगाबाद येथे केली. मनोहर जोशींनी पुन्हा 8 मार्च 1997ला पैठण येथील संतपीठ सुरू करण्यात येईल, अशी पुनश्च घोषणा औरंगाबाद येथे केली.

1998 मध्ये संतपीठाचे भूमिपूजन -

पैठण येथील संतपीठ तातडीने उभारले जावे, म्हणून आमदार सर्वश्री संदीपान भुमरे, अनिल पटेल, ना. स. फरांदे, नरेंद्र पाडवी, रामकृष्ण मांडवी, विष्णु सावरा, दिगंबर विशे, नाना कोकरे, विमल मुंदडा यांनी दि. 31 मार्च व 3 एप्रिल 1997 ला सभागृहात चर्चा घडवुन आणली. संतपीठ विश्वस्त मंडळाची स्थापना शासननिर्णय 29 नोव्हेंबर 1997अन्वये करण्यात आली. संतपीठाची सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी (पंजीकरण) सहाय्यक धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई विभाग मुंबई कार्यालयात दि. 17 सप्टेंबर 1998मध्ये झाली आहे. संतपीठ भुमीपुजन सोहळा 4 नोव्हेंबर 1998 रोजी तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत झाला.

संतपीठाचे पीठाचार्य म्हणुन हभप प्रकाश म. बोधले यांची नियुक्ती दि. 14 फेब्रुवारी 2006 शासन निर्णयान्वये पाच वर्षासाठी करण्यात आली. पक्षी अभयारण्यातुन संतपीठ तथा ज्ञानेश्वर उद्यान वगळण्यात यावे, म्हणुन सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेतील सेंट्रल एंपॉवर कमिटी, नवी दिल्ली यांच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. संतपीठाची जमीन ही या आरक्षणातुन वगळण्याबाबत महसुल व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद यांच्याकडुन शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या सेंट्रल एंपॉवर कमिटीस करण्यात आली.

संतपीठाची प्रशासकीय इमारत व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे वसतिगृह इमारत सन 2008-09 मध्ये बांधुन पूर्ण झाली. संतपीठ सुरू होण्यासाठी तत्कालिन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दि. 1 फेब्रु. 2011ला मुंबईत बैठक घेतली. सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दि. 4 ऑक्टोबरला 2012 रोजी झालेल्या बैठकीत संतपीठाच्या अभ्यासक्रमाबाबत अभ्यासगट नेमण्याचा निर्णय झाला. सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते संतपीठ इमारतीचे उद्घाटन 13 फेब्रुवारी 2014ला झाले. मात्र, प्रत्यक्षात अभ्यासक्रम सुरू झालाच नाही. शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली संतपीठ चालविले जाईल, अशी घोषणा तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दि. 26 ऑक्टोबर 2015ला आळंदीत केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. चोपडे यांनी पैठण येथील संतपीठ जुन 2016 पासुन सुरू करण्यात येईल, अशी घोषणा पैठण येथे 5 फेब्रुवारी 2016 ला केली.

सरकारने घोषित केलेले संतपीठ त्वरित कार्यान्वित करावे, असा ठराव अखिल भारतीय साहित्य संमेलनाने 18 फेब्रुवारी 2018ला गुजरात येथील बडोदा येथे संमत केला. संतपीठ कामाला गती मिळावी, म्हणून विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी मे/जुन 2018 मध्ये औरंगाबाद येथे बैठक घेतली. यानंतर तत्कालीन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन नागपुर येथे दि. 10 जुलै 2018ला झालेल्या बैठकीत पैठण येथील संतपीठ जुन 2019 पासुन सुरू करण्याची कार्यवाही शासनाने करावी असा निर्णय झाला.

राज ठाकरेंना निवेदन -

पैठण येथे 20 जुलै 2018ला मनसे नेते राज ठाकरे आले असता संतपीठ प्रश्नात लक्ष घालुन सहकार्य करावे, म्हणुन त्यांना स्थानिकांनी निवेदन दिले. संतपीठाचा प्रस्ताव तयार करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नोडल ऑफिसर म्हणुन माजी उपमहापौर संजय जोशी, प्रभारी कुलगुरू अशोक तेजनकर व उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसचिव सिध्दार्थ खरात यांचीही 20 जुलै 2018 ला नियुक्ती केली. संतपीठ प्रस्ताव तथा अभ्यासक्रम समीतीने आपला अंतिम अहवाल 11 डिसेंबर 2018ला राज्य सरकारचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना समक्ष भेटुन सादर केला.

वारकऱ्यांची नाराजी -

23 एप्रिल 2019 लोकसभा निवडणुकीवर संतपीठ सुरू होत नसल्यामुळे अण्णा हजारे संघटना तथा प्रतिसाद संघटना पैठणकडून निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालतो, असे आश्वासन दिल्याने निवडणूकीवरील बहिष्कार मागे घेतला. यानंतर 18 जुन 2019ला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. त्या अर्थसंकल्पात संतपीठासाठी आर्थिक तरतुद न केल्याने वारकरी संघटनेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

उदय सामंत यांची घोषणा -

24 जुन 2019ला संत एकनाथ महाराज दिंडीने पंढरपुरकडे प्रस्थान केले. त्यावेळी वारकरी संघटनेने गागाभट्ट चौकात भजन आंदोलन केले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे 19 सप्टेंबर 2020ला पैठण येथे आले असता दिनेश पारीख, विष्णु ढवळे, रमेश पाठक यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन 38 वर्षापासुन प्रलंबित संतपीठ तत्काळ सुरू करावे, अशी आग्रही मागणी केली. पैठण येथे जानेवारी 2021पासुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संतपीठ प्रत्यक्षात सुरू करण्यात येईल, अशी घोषणा उच व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी 19 सप्टेंबर 2020 रोजी पैठण येथील पत्रकार परिषदेत केली.

अखेर तो दिवस उजाडला -

पैठण येथील संत एकनाथ महाराज संतपीठात लवकर अभ्यासक्रम सुरू करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 9 सप्टेंबर 2021ला मुंबई येथे औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकप्रसंगी दिले. तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने 17 सप्टेंबर 2021ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संतपीठाचे लोकार्पण करण्यात आले.

संतपीठात कोणते अभ्यासक्रम असणार -

यावेळी रोहयोमंत्री भुमरे यानी संतपीठाला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. आजचा दिवस माझ्यासाठी तसेच पैठणवासियांसाठी आनंदाचा दिवस आहे. 20 सप्टेंबरपासुन प्रवेश सुरू होणार आहे. आक्टोबरमध्ये अभ्यासक्रमाला सुरुवात होणार आहे. या संतपीठाला निधी कमी पडु देणार नाही. या संतपीठात टप्याटप्याने विविध संत साहित्याचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, भजन किर्तन, गाथा भजन यावर प्रमाणपत्र कोर्सेस तसेच 50 विद्यार्थ्यांना निवासी सोय करण्यात येणार असुन हे संतपीठ न राहता राज्यस्तरीय विद्यापीठ होईल, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली.

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.