अमरावती-चांदूर रेल्वे मार्गावर बिबट्या ठार; अज्ञात वाहनानं दिली धडक

अमरावती-चांदूर रेल्वे मार्गावर बिबट्या ठार; अज्ञात वाहनानं दिली धडक
Leopard Death In Amaravati: अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट गंभीर जखमी होऊन ठार झाले. (Leopard killed in Wadali Pohra forest) ही घटना अमरावती शहरालगत असणाऱ्या वडाळी पोहरा जंगल परिसरातून जाणाऱ्या अमरावती-चांदुर रेल्वे मार्गावर आज (गुरुवारी) सकाळी घटली. (Leopard killed in vehicle collision) वडाळी प्रभागाच्या माजी नगरसेविका सपना ठाकूर आणि त्यांचे पती शैलेंद्र ठाकूर यांच्यामुळे ही घटना उघडकीस आली.
अमरावती Leopard Death In Amaravati : शहरालगत असणाऱ्या वडाळी पोहरा जंगल परिसरातून जाणाऱ्या अमरावती-चांदुर रेल्वे मार्गावर गुरुवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनानं धडक दिली. या अपघातात बिबट्या गंभीर जखमी होऊन ठार झाला. या परिसरात अनेक बिबटे असून आज या भागात बिबटा ठार झाल्यामुळं खळबळ उडाली.
रस्त्याच्या कडेला पडला होता बिबट्या : अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेनंतर बिबट्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झुडपात मृतावस्थेत पडला होता. वडाळी प्रभागाच्या माजी नगरसेविका सपना ठाकूर ह्या सकाळी आपले पती शैलेंद्र ठाकूर यांच्यासह जंगल परिसरात नेहमीप्रमाणे फिरायला गेले असताना त्यांना रस्त्याच्या कडेला मृत बिबट्या आढळून आला. यावेळी शैलेंद्र ठाकूर यांनी वनविभागाला बिबट्या ठार झाल्या संदर्भात माहिती दिली. यानंतर काही वेळातच वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृत बिबट्याला वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात असणाऱ्या बांबू उद्यानात आणण्यात आलं.
फुटका तलाव परिसरात करणार अंत्यसंस्कार : अपघातात ठार झालेल्या बिबट्याचे वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन केले जाणार आहे. यानंतर बांबू गार्डनच्या मागच्या बाजूला असणाऱ्या फुटका तलावामागे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
पोहरा जंगल परिसरात अनेक बिबटे : पोहरा जंगल परिसरात 35 च्या वर बिबटे असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोहरा मालखेड वडाळी चिरवडी या जंगल परिसरात बिबट्याचा वावर आहे. हे बिबटे अनेकदा अमरावती शहरालगत असणाऱ्या फुटका तलाव, वडाळी तलाव, राज्य राखीव पोलीस दल वसाहत परिसर, महादेव खोरी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसर, तपोवन परिसर, श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या परिसरात देखील अनेकदा आढळून आले आहेत. सध्या विदर्भ महाविद्यालय परिसरासह महादेव खोरी आणि मंगलधाम परिसरात दिसणारे बिबट हे याच जंगल भागातून आले आहेत.
यापूर्वीही घडली होती अशीच घटना : वडाळी पोहरा जंगलातून जाणाऱ्या महामार्गावर यापूर्वीही वाहनाच्या धडकेत बिबट्याला जीव गमवावा लागला होता. अमरावती शहरालगत असणाऱ्या वडाळी पोहरा जंगलातून जाणाऱ्या अमरावती-वर्धा मार्गावर रविवारी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाला. ही घटना 3 जानेवारी, 2022 रोजी घडली होती. या मार्गावर गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली.
वडाळी पोहरा जंगलात वन्य प्राण्यांचे वास्तव्य : शहरापासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या वडाळी पोहरा जंगलात मोठ्या संख्येने वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. या जंगलात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून नीलगाय, खवले मांजर, रान डुक्कर, हरीण, मोर असे विविध प्राणी आणि पक्षी आहेत. या जंगलात एकूण सात ते आठ तलाव असून, या तलावांवर पाणी पिण्यासाठी रात्री आणि पहाटेच्या सुमारास वन्यप्राणी अमरावती-वर्धा मार्ग ओलांडतात. यामुळे या मार्गावर वन्य प्राण्यांचा बळी गेला आहे.
हेही वाचा:
