भिवापूरकर तलावाच्या अवस्थेची प्रशासनाने घेतली दखल; गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु

author img

By

Published : Sep 20, 2021, 4:46 PM IST

Updated : Sep 20, 2021, 4:58 PM IST

भिवापूरकर तलाव

तलावातील पाण्याची पातळी कमी व्हावी यासाठी जेसीबीद्वारे भिंत फोडून नाल्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. या तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होण्यास मदत व्हावी यासाठी तलावात अनेक ठिकाणी पाइप टाकून या पाइपद्वारे लांब अंतरापर्यंत पंपाद्वारे पाणी सोडले जात आहे. जंगल परिसरात असणाऱ्या या तलावात 10 जेसीबी 20 ट्रक, 17 ट्रॅक्टरद्वारे गाळ आणि तलावातील खडक काढण्याचे काम सुरू आहे.

अमरावती - गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे अमरावती शहरापासून चाळीस किलोमीटर अंतरावर असणारा भिवापूरकर तलाव तुडुंब भरल्याने या तलावाच्या भिंतीला तडे गेल्यामुळे तलावा लगतच्या अनेक गावांना धोका निर्माण झाला होता. जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रकाराची त्वरित दखल घेत तलावातील पाणी झपाट्याने बाहेर सोडण्याचे काम हाती घेतले आहे. आता तलावातील पाण्याची पातळी कमी झाली असल्याने भीत टळली आहे. या तलावात दहा जेसीबी उतरवण्यात आले असून तलावातील पाणी व तलावातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

भिवापूरकर तलावाच्या अवस्थेची प्रशासनाने घेतली दखल
ग्रामस्थांमध्ये निर्माण झाले होते भीतीचे वातावरण

मुसळधार पावसामुळे भिवापूरकर तलाव तुडुंब भरल्याने आणि तलावाच्या भिंतीला तडा गेल्यामुळे परिसरातील आरड, कुऱ्हाड, ऊदखेड, पारडी या गावांना धोका निर्माण झाला होता. तलावाची भिंत फुटून पाणी गावात शिरले तर आपले काय होणार या भीतीने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली होती. 10 सप्टेंबरची संपूर्ण रात्र या सर्व गावातील रहिवाशांनी जागून काढली होती. दरम्यान आमदार रवी राणा यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी दहा सप्टेंबरच्या रात्रीच आराड, कुराड या गावालगत असणाऱ्या भिवापूरकर तलाव परिसरात पोहोचले. दुसऱ्या दिवशी सकाळपासून तलावाच्या दुसर्‍या बाजूला नाल्याकाठी असणारी इंग्रजकालीन भिंत फोडून तलावातील पाणी नाल्यात सोडण्यात आले. त्यामुळे तलावातील पाण्याची पातळी कमी होवू लागली आहे.

तलावाच्या भिंतीचे होणार नूतनीकरण

तलाव फुटण्याची दाट शक्यता पाहता जिल्हा प्रशासनाने भिवापूरकर तलावातील पाणी बाहेर काढण्याचे काम त्वरित हाती घेतले. आता तलावातील पाणी कमी झाल्यामुळे दीडशे वर्ष जुन्या असणाऱ्या भिवापूरकर तलावाच्या भिंतीचे नूतनीकरण केले जाणार आहे. या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन कोटी रुपये दिली असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली आहे. वनविभागाने लक्ष न दिल्यामुळे तलावाची दुरावस्था झाल्याचा आरोपही आमदार रवी राणा यांनी केला आहे. तलावातील पाण्याची पातळी कमी व्हावी यासाठी जेसीबीद्वारे भिंत फोडून नाल्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. या तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होण्यास मदत व्हावी यासाठी तलावात अनेक ठिकाणी पाइप टाकून या पाइपद्वारे लांब अंतरापर्यंत पंपाद्वारे पाणी सोडले जात आहे. जंगल परिसरात असणाऱ्या या तलावात 10 जेसीबी 20 ट्रक, 17 ट्रॅक्टरद्वारे गाळ आणि तलावातील खडक काढण्याचे काम सुरू आहे.

'अफवांवर विश्वास ठेवू नका'

दीडशे वर्ष जुना भिवापूरकर तलाव बुजवल्या जाणार असून यामुळे लगतच्या परिसरात पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, अशा स्वरूपाच्या अफवा पसरविल्या जात आहे. मात्र अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन आमदार रवी राणा यांनी केले आहे. या तलावात पाणी असणे ही काळाची गरज असून तलावाची भिंत मजबूत करणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या तलावातील पाण्याची पातळी कमी केली जात असल्याचे आमदार रवी राणा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - कापसाचे बोंड काळवंडल्याने झाले नुकसान, शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत

Last Updated :Sep 20, 2021, 4:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.