डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ शरद गडाख

author img

By

Published : Sep 19, 2022, 6:18 PM IST

Updated : Sep 19, 2022, 6:24 PM IST

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ शरद गडाख

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी (Punjabrao Deshmukh Agricultural University) अखेर सोमवारी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद रामराव गडाख यांच्या नावाची घोषणा झाली (Dr Sharad Gadakh appointed Vice Chancellor). राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे.

अकोला - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी अखेर सोमवारी (19 सप्टेंबर) महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद रामराव गडाख यांच्या नावाची घोषणा झाली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. विद्यापीठाचे डॉ. गडाख हे 22 वे कुलगुरू असणार आहे. डॉ. विलास भाले हे सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. गडाख यांची निवड झाली आहे.

नवीन कुलगुरू पदासाठी निवड प्रक्रिया - प्रा. डॉ. विलास भाले यांचा कुलगुरूपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 4 सप्टेंबरला पूर्ण झाल्याने त्यापूर्वीच ऑगस्ट महिन्यापासून नवीन कुलगुरू पदासाठी निवड प्रक्रिया सुरू झाली होती. या पदासाठी 30 हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. 20 ऑक्टोबर 1969 रोजी स्थापन झालेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात विदर्भातील 11 जिल्ह्यांचा समावेश आहे. आतापर्यंत विद्यापीठाचे 20 कुलगुरू झाले असून डॉ. गडाख हे 22 वे कुलगुरू ठरले आहेत.

पाच जणांची शिफारस - अर्जांची छाननी करून इच्छुक पात्र उमेदवारांची प्राथमिक मुलाखत, सादरीकरण होऊन निवड समितीने पाच उमेदवारांची शिफारस राज्यपालांकडे केली होती. या पाच इच्छुकांच्या 7 सप्टेंबरला मुंबईत राजभवन येथे मुलाखती पार पडल्या. त्यानंतर राज्यपालांकडून कोणाच्या नावाची घोषणा होणार याकडे लक्ष लागले होते. दरम्यान डॉ. भाले निवृत्त झाल्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीचे कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप मालखेडे यांच्याकडे कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा प्रभार सोपविण्यात आला होता. अखेर सोमवारी डॉ. शरद रामराव गडाख यांच्या नावाची घोषणा झाली आहे.

ही नावे होती शर्यतीत - विद्यापीठ सूत्रांच्या मते कुलगुरूपदाच्या शर्यतीत परभणी येथील संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, राहुरी येथील संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथील डॉ. विजय वाघमारे व भारतीय मृदा विज्ञान संस्थान भोपाळ येथील डॉ. पात्रा आदी शर्यतीत होते.

ही आहेत आव्हाने - विदर्भात कृषी विद्यापीठ असूनही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांनी हा प्रदेश चर्चेत राहतो. त्यात ज्या पश्चिम विदर्भात विद्यापीठ आहे. तेथे अनेक प्रश्नांना शेतकरी तोंड देतात. शेतकरी आत्महत्या, दरवर्षी मानगुटीवर बसलेले बोंडअळी किडीचे संकट, उगवण क्षमतेत कमी उतरणारे बियाणे आदी अनेक प्रश्नांना शेतकरी तोंड देत असल्याने पांढरा हत्ती म्हणून विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जातो. अशा व यासंदर्भातील अनेक प्रश्नांवर कुलगुरूंना काम करावे लागणार आहे.


डॉ गडाख यांचा परिचय व कार्य - डॉ. शरद गडाख सध्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या संशोधन व विस्तार शिक्षण संचालकपदी कार्य करत आहेत. त्यांची कृषि विद्यापीठात 38 वर्ष सेवा झाली आहे. या सेवेकाळात त्यांनी विविध पदावंर काम केलेले आहे. त्याच्या कार्यकाळात विद्यापीठाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरु झाली. त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम महात्मा फुले कृषि विद्यापीठात राबविले. यामध्ये विद्यापीठाची पडीक जमीन लागवडीखाली आणणे, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठाचे विक्री केंद्र सुरु करणे, फळबागेखाली लागवड क्षेत्र वाढविणे, विविध फळांचे प्रात्यक्षिक प्रकल्प, सेंद्रिय शेती प्रकल्प,देशी गाय संशोधन अंड प्रशिक्षण केंद्र, शेती मध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर, जास्तीत जास्त क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणणे, बिजोत्पादन वाढविणे, एकात्मिक शेती पध्दत मॉडेल, मॉडेल व्हिलेज इ. नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविले. यामुळे विद्यापीठाच्या महसुली उत्पादनात वाढ होवून शेतकर्यांना त्यांच्या जिल्ह्यातच विद्यापीठाचे उत्पादने उपलब्ध झाली. तसेच शेतकरी प्रथम आणि मॉडेल व्हिलेज संकल्पनेमुळे कृषि विस्तारामध्ये नविन मापदंडे स्थापीत झाली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात दैदिप्यमान कार्य केलेले आहे. त्यांनी विविध पिकांचे 19 वाण विकसित केलेले आहेत. यामध्ये वांग्याचा एक, कारल्याचे पाच, काकडीचे दोन, वालचे एक, ज्वारीचे नऊ आणि नागलीचा एक वाण विकसित केलेले आहे. त्यांचे आत्तापर्यंत 80 संशोधन लेख, 43 तांत्रिक लेख, 144 विस्तार लेख आणि विविध प्रकाशने प्रसिध्द झालेली आहेत. त्यांनी विकसीत केलेल्या ज्वारीच्या पंचसुत्री व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे शेतकर्यांना कोरडवाहू ज्वारीचे शाश्वत उत्पन्न मिळू लागले आहे. त्यांच्या शिक्षण, संशोधन आणि कृषि विस्तारातील अभुतपूर्व योगदानामुळे त्यांना जागतिक स्थरावरील एक पुरस्कार, राष्ट्रीय पातळीवरील तीन पुरस्कार आणि राज्य पातळीवरील सहा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

Last Updated :Sep 19, 2022, 6:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.