कोट्यवधींची फसवणूक करून 'बिग - मी'चे 'बंटी - बबली' फरार; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

author img

By

Published : Dec 5, 2021, 4:47 AM IST

tofkhana police station

गुंतवणुकीवर दैनंदिन परताव्याचे आमिष दाखवत नगर शहरासह राज्यात 'बिग - मी इंडिया कंपनी' नावाने अनेक पतसंस्था, एजन्सीज आणि नागरिकांना कोट्यवधींची फसवणूक करून कंपनीचे संचालक दांपत्य फरार झाल्याने अनेक गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहे.

अहमदनगर - गुंतवणुकीवर दैनंदिन परताव्याचे आमिष दाखवत नगर शहरासह राज्यात 'बिग - मी इंडिया कंपनी' नावाने अनेक पतसंस्था, एजन्सीज आणि नागरिकांना कोट्यवधींची फसवणूक करून कंपनीचे संचालक दांपत्य फरार झाल्याने अनेक गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहे.

माहिती देताना तक्रारदार

हेही वाचा - ST Workers strike : एसटीचे 98 वर्षीय पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांनी संपाबद्दल व्यक्त केली नाराजी

फसवणूक झाल्याने गुंतवणूकदार हवालदिल

याबाबत सतीश बाबूराव खोडवे यांच्यासह अनेकांनी आता पुढे येत तोफखाना पोलीस ठाण्यात 'बिग मी' चे संचालक सोमनाथ एकनाथ राऊत आणि त्याची पत्नी सोनिया सोमनाथ राऊत यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या नगर शहारापुरती ही रक्कम तब्बल 7 कोटी 68 लाख 64 हजार इतकी आहे. यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, राज्यात अनेक शहरांत या दांपत्याने गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केली असून, हा आकडा पन्नास कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता तक्रारदार गुंतवणूकदारांनी व्यक्त केली आहे.

डिजिटल व्हॉलेटच्या माध्यमातून आमिष

'बिग-मी' कंपनी आपल्या फंड पे डिजिटल व्हॉलेटच्या माध्यमातून पतसंस्था, एजन्सींना मोबाईल, लाईटबिल, डिशटीव्ही पे, पैसे भरणे - काढणे यासाठी डिजिटल व्हॉलेटची ऑफर देत होती. एक लाखाला दैनंदिन तीनशे ते दीड हजार रुपयांपर्यंत कमिशन त्यासाठी गुंतवणूकदारांना देण्याची हमी कंपनीने दिली होती. कंपनीच्या डिजिटल व्हॉलेट प्रमोशनसाठी कंपनीने अनेक एजंट, अधिकारी महिला - पुरुषांची नेमणूक केली होती. प्रत्यक्ष संपर्क, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आकर्षक योजना दिल्या गेल्या. त्यात अनेक जण अडकले आणि लाखोंची गुंतवणूक केली गेली. या माध्यमातून कंपनीने कोट्यवधी रुपये जमा केले.

29 ऑगस्टला कंपनीला अचानक कुलूप -

दिनांक 28 ऑगस्ट 2021 पर्यंत नियमित व्यवहार सुरू असताना कंपनीने 29 ऑगस्ट 2021 रोजी अचानक सर्व सेवा बंद केल्या. संचालक, कर्मचारी - अधिकारी यांचे फोन बंद झाले. गुंतवणूकदार संचालक सोमनाथ एकनाथ राऊत यांच्या कंपनी आणि घराच्या पत्त्यावर गेले असता तिथे कुलूप लावलेले आढळून आले. काहींनी सोमनाथ राऊतची सासुरवाडी असलेल्या नेवासे तालुक्यातील घरी चौकशी केली असता सोमनाथ आणि पत्नी सोनिया यांनी आपली दोन मुले सासूरवाडीत ठेवून पैशाची व्यवस्था करायला जातो, असे सांगून निघून गेल्याची माहिती दिली.

एकूण सात आरोपींवर गुन्हा दाखल

एकंदरीत आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अनेकांनी कंपनी कार्यालय तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली. सतीश बाबूराव खोडवे यांच्या लेखी तक्रारीवरून काल (शनिवारी) पोलिसांनी आईपीसी कलम 379 अंतर्गत सोमनाथ एकनाथ राऊत आणि सोनिया सोमनाथ राऊत यांच्यासह सीईओ वंदना पालवे, बिजनेस मॅनेजर प्रीतम शिंदे, शोलमन गायकवाड, सेल्स मॅनेजर प्रीती शिंदे, सपोर्ट मॅनेजर सुप्रिया आरेकर अशा सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या तरी हे सर्व फरार असल्याचे समजते. पुढील तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर हे करत आहेत.

हेही वाचा - शिर्डीत दोन मृतदेह आढळल्याने खळबळ, गारठून मृत्यू झाल्याचा संशय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.