तिसऱ्या लाटेचा उगम नगर जिल्ह्यातून होऊ शकतो; विभागीय आयुक्तांचा इशारा, लंकेंचे कोविड सेंटर सज्ज

author img

By

Published : Sep 22, 2021, 8:07 PM IST

Updated : Sep 22, 2021, 8:53 PM IST

mla lanke

सध्या नगर जिल्ह्यात पाच हजारांच्या आसपास अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे राज्यातील तिसऱ्या लाटेचा उगम नगर जिल्ह्यातून होऊ शकतो, असा इशारा नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला आहे.

अहमदनगर - राज्यातील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत भौगोलिक विस्ताराने मोठा असलेला नगर जिल्हा चांगलाच बाधित झाला. बेडची संख्या कमी, अपुरा ऑक्सिजन पुरवठा, ऑक्सिजनची पळवापळवी आणि जास्ती मृत्युदर, त्यातून जळत्या चितांचे मन हेलावणारे दृश्य नगर जिल्ह्यातून पाहायला मिळाले. संभाव्य तिसऱ्या लाटेचा उगम हा नगर जिल्ह्यातूनच होऊ शकतो, असा इशारा नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला आहे.

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

कोरोना परिस्थितीत भाळवणी येथील आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेले 1100 खाटांचे कोविड सेंटर राज्यात चर्चेत आले ते तेथील सोईसुविधांमुळे. आताही या कोविड सेंटरमध्ये रुग्ण येत असल्यामुळे हे कोविड सेंटर सुरूच आहे. दुसरीकडे सध्या नगर जिल्ह्यात पाच हजारांच्या आसपास अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे राज्यातील तिसऱ्या लाटेचा उगम नगर जिल्ह्यातून होऊ शकतो, असा इशारा नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला आहे.

हेही वाचा - IPL 2021 : सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजाला कोरोनाची लागण; IPL वर अनिश्चिततचे सावट

  • आमदार लंकेंचे कोविड सेंटर पाच महिने सलग सुरूच-

वैष्णव जन तो, तेणें कहीये ये जे, पिड पराई जाने रे, पर दुख्खे उपकार करे तो हे, मन अभिमान ना, आने रे..' राष्ट्रपिता महात्मा गांधींचे हे आवडते भजन. या भजनाचा सार ज्याला समजला त्याला भारतीय संस्कृती समजली असे मानले जाते. जात, धर्म, पंथ यापुढे जाऊन समाजाच्या अडचणीत एकमेकाला नि:स्पृह मदत करणे हा आपल्या भारतीयत्वचा दाखला. याच अनुषंगाने देशावर ज्यावेळी सामूहिक संकट येते त्या वेळी एकवर्ग पुढे येत सामाजिक जबाबदारी पाळत आला आहे. असेच एक संकट गेल्या दोन वर्षांपासून जगावर आणि भारतात असताना अनेक घटक पुढे येत यात आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. असेच एक उदाहरण म्हणजे, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील शरद पवार आरोग्य मंदिर. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अकराशे खाटांचे हे कोविड सेंटर सुरू केले आहे. दुसरी लाट ओसरली असे गृहीत धरून इतर अनेक खासगी कोविड सेंटर बंद झाले असताना, ऍक्टिव्ह रुग्णासाठी मोठा आधार हे कोविड सेंटर बनले आहे. आतापर्यंत 28 हजार रुग्ण येथून उपचार घेऊन घरी परतले आहेत. विशेष बाब म्हणजे या कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. कोरोना नव्हे तर भीतीने अनेक रुग्ण दगावतात आणि ती भीती आम्ही इथे घालवतो, असे आमदार लंके यांचे मत आहे. सुसज्ज आरोग्य व्यवस्था, आपुलकीची सेवा, स्वादिष्ट आणि पूरक आहार, मनोरंजन आदी सुविधा आणि त्याही मोफत मिळतात. त्यामुळे रुग्ण हसत-खेळत या ठिकाणी बरा होत असल्याचा दावा आमदार लंके यांनी केला आहे. या सर्व यंत्रणेला मोठा खर्च असला तरी तो लोकसहभागातून होत आहे. केवळ तालुका-जिल्ह्यातून नव्हे तर राज्य-देश आणि त्याबरोबर विदेशातून मदत मिळत असल्याने हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

  • अनेक कोविड सेंटर बंद-

केवळ जिल्ह्यात नव्हे तर राज्यातील अनेक ठिकाणचे कोविड सेंटर दरम्यानच्या काळात बंद झाले. शासनाने सध्या फक्त शासकीय आणि धर्मदाय विभागाकडून मान्यताप्राप्त कोविड सेंटर सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. या परिस्थितीत शासकीय सेंटर आणि इतर सेंटरमधील परिस्थिती काय आहे हे सर्वश्रुत असताना आमदार लंकेच्या कोविड सेंटरमध्ये आजही राज्यातील रुग्ण दाखल होऊन उपचार घेत आहेत.

  • जिल्ह्यात आजही जास्त रुग्ण संख्या-

राज्यात रुग्णसंख्या कमी होत असताना ज्या पाच-सात जिल्ह्यात रुग्ण संख्या अधिक आहे, त्यात नगर जिल्ह्याचा समावेश आहे. त्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील रुग्ण संख्या ही मोठी आहे, दोनशेच्या आसपास रुग्ण या जिल्ह्यात रोज समोर येत आहेत. त्या खालोखाल पारनेरमध्ये रुग्ण आहेत. काल मंगळवारच्या आकडेवारीनुसार नगर जिल्ह्यात पाच हजारच्या जवळपास ऍक्टिव्ह रुग्ण असून, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याची दखल घेत जिल्हा दौरा करून आढावा घेतला आहे. त्यानुसार राज्यात तिसरी लाट नगर जिल्ह्यातून सुरू होऊ शकते, असा गर्भित इशारा त्यांनी दिला आहे.

  • आयुक्तांच्या इशाऱ्याकडे लक्ष द्या-

एकूणच जिल्ह्यात आणि राज्यातील अनेक कोविड सेंटर बंद होत असताना, तिसरी लाट नगर जिल्ह्यातून सुरू होऊ शकते, असा प्रशासकीय अभिप्राय असतांना नगर जिल्ह्यात कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे समोर येत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आदी यंत्रणां कारणीभूत ठरणार आहे, तसा इशारा आणि आदेश विभागीय आयुक्तांनी दिलेला आहे. या परिस्थितीत आमदार निलेश लंके यांनी ग्रामीण भागातील आपले कोविड सेंटर संपूर्ण यंत्रणेसह सुरू ठेवणे याकडे सकारात्मक पाहणे गरजेचे असून, इतर खासगी कोविड सेंटर सज्ज असणे गरजेचे आहे.

हेही वाचा - कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांनी लसीकरणाचा वेग वाढवा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Last Updated :Sep 22, 2021, 8:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.