DC Vs RR : दिल्लीने उडवला राजस्थानचा धुव्वा; गुणतालिकेत गाठलं अव्वलस्थान

author img

By

Published : Sep 25, 2021, 7:14 PM IST

Updated : Sep 25, 2021, 7:39 PM IST

IPL 2021 DC Vs RR : Delhi Capitals beat rajasthan royals by runs, reclaim top spot

दिल्लीने आज राजस्थान रॉयल्स संघाचा 33 धावांनी पराभव केला. या विजयासह दिल्ली गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचली आहे. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघासमोर विजयासाठी 155 धावांचे आव्हान ठेवले होते. परंतु राजस्थानच्या संघाला हे आव्हान पेलावले नाही. त्यांच्या संघाला 20 षटकात 6 बाद 121 धावांपर्यंत मजल मारता आली.

अबुधाबी - आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची विजयी घौडदौड कायम आहे. दिल्लीने आज राजस्थान रॉयल्स संघाचा 33 धावांनी पराभव केला. या विजयासह दिल्ली गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचली आहे. तसेच त्यांनी प्ले ऑफ फेरीत आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघासमोर विजयासाठी 155 धावांचे आव्हान ठेवले होते. परंतु राजस्थानच्या संघाला हे आव्हान पेलावले नाही. त्यांच्या संघाला 20 षटकात 6 बाद 121 धावांपर्यंत मजल मारता आली. कर्णधार संजू सॅमसन याने नाबाद 70 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. पण तो देखील आपल्या संघाचा पराभव टाळू शकला नाही. दिल्लीकडून एनरिक नार्खियाने सर्वाधिक 2 गडी बाद केले. तर आवेश खान, आर. अश्विन, कगिसो रबाडा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.

दिल्लीने दिलेल्या 155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरूवात खराब झाली. लियान लिविंगस्टोन (1), यशस्वी जैस्वाल (5) आणि डेविड मिलर (2) स्वस्तात बाद झाले. यामुळे राजस्थानची अवस्था 4.2 षटकात 3 बाद 17 अशी झाली. अशात कगिसो रबाडाने महिपाल लोमरोरला (19) बाद करत राजस्थान संघाला बॅकफूटवर ढकलले. यानंतर रियान परागची (2) शिकार अक्षर पटेलने केली. तेव्हा राजस्थानची अवस्था 11.5 षटकात 5 बाद 55 अशी झाली.

कर्णधार संजू सॅमसनने एक बाजू लावून धरली. त्याला राहुल तेवतियाची साथ मिळाली. दोघांनी सहाव्या गड्यासाठी 44 भागिदारी केली. पण ते धावगती राखण्यास अपयशी ठरले. 18व्या षटकात नार्खियाने तेवतियाला (9) बाद केले. दुसरीकडे सॅमसनने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो अखेरपर्यंत नाबाद राहिला. त्याने 53 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 70 धावांची खेळी केली. पण तो देखील संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. राजस्थानच्या संघाला 20 षटकात 6 बाद 121 धावांपर्यंत मजल मारता आली आणि दिल्लीने हा सामना 33 धावांनी जिंकला. नार्खियाने 2 तर आवेश खान, आर. अश्विन, कगिसो रबाडा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.

तत्पूर्वी, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून दिल्लीच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तेव्हा शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या सलामीवीर जोडीला चांगली सुरूवात करून देण्यात अपयश आले. शिखर धवन (8) कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. या धक्क्यातून सावरत असलेल्या दिल्लीला चेतन सकारियाने पृथ्वी शॉला (8) बाद करत आणखी अडचणीत आणले.

श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी करत दिल्लीचा डाव सावरला. संघाची धावसंख्या 83 असताना मुस्तफिजूर रहमान याने पंतला क्लिन बोल्ड केले. त्याने 24 धावांची खेळी केली. पंतपाठोपाठ अय्यर देखील माघारी परतला. त्याला राहुल तेवतियाने सॅमसनकडे झेल देण्यास भाग पाडले. अय्यरने 32 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांसह 43 धावांची खेळी साकारली.

अय्यर बाद झाल्यानंतर शिमरोन हेटमायरने डावाची सूत्रे आपल्या घेत फटकेबाजी केली. त्याला ललित यादवने साथ दिली. मुस्तफिजूरने हेटमायरला बाद करत ही जोडी फोडली. हेटमायरने 16 चेंडूत 28 धावांची खेळी केली. यानंतर अक्षर पटेल 12 धावांवर बाद झाला. अखेरीस ललित यादव (नाबाद 14) आणि आर अश्विन ( नाबाद 6) जोडीने दिल्लीला 6 बाद 154 धावांपर्यंत मजल मारून दिली. राजस्थानकडून मुस्तफिजूर आणि सकारिया यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. तर त्यागी आणि तेवतिया यांना प्रत्येकी 1-1 गडी बाद करता आला.

हेही वाचा - IPL 2021 : सहा गडी राखत चेन्नईचा बंगळुरूवर विजय, गुणतालिकेत सीएसकेची अव्वल स्थानी झेप

हेही वाचा - PBKS vs SRH : हैदराबादने नाणेफेक जिंकली, पंजाबची प्रथम फलंदाजी

Last Updated :Sep 25, 2021, 7:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.