Occasion of Ekadashi: आमलकी एकादशी; श्री विठ्ठल-रुक्मिणी गाभाऱ्यात एक टन द्राक्षापासून द्राक्षांची आरास
Published: Mar 3, 2023, 12:33 PM

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शुक्रवार दि.3 मार्च,फाल्गुन शु.एकादशी म्हणजेच आमलकी एकादशी निमित्त गाभाऱ्यात द्राक्षांची मनमोहक आरास केली आहे. श्री.विठ्ठल व श्री.रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात सुंदर व मनमोहक अशी द्राक्ष्याची आरास करण्यात आली आहे. एक टन द्राक्षापासून ही सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील भाविक बारामती येथील भाविक बाबासाहेब शेंडे, पुनम शेंडे आणि सचिन चव्हाण यांनी ही द्राक्ष सजावट अर्पण केली आहे. वैशिष्ट्यपूर्ण दिवस असतात तेव्हा मंदिर समितीच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे आरास विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यात केली जाते. आज विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यामध्ये आमलकी एकादशी निमित्त द्राक्षांची आरास करण्यात आली आहे.
हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी असे संबोधले जाते. या एकादशीला भगवान विष्णूची आवळ्याने पूजा केली जाते. आमलकी एकदशी यावर्षी ३ मार्चला येत आहे. यावर्षी आमलकी एकादशीला तीन योग जुळून आले आहेत. त्यामुळे या एकादशीचे महत्व वाढले आहे. त्यामुळे जाणून घ्या कोणत्या पद्धतीने पूजा करावी याबाबतची माहिती.
आमलकी एकादशीची काय आहे अख्यायिका : आमलकी एकादशीला महादेव आणि पार्वती काशीला आल्याची अख्यायिका आहे. महादेव पार्वती काशीला आल्यानंतर त्यांच्यासोबत भक्तांनी फुलांची होळी खेळल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे होळीच्या अगोदर येणाऱ्या आमलकी एकादशीचे महत्व आणखी वाढले आहे. तर दुसरीकडे ब्रह्मदेव भगवान विष्णूच्या नाभीतून अवतरले. यावेळी त्यांनी स्वत:ला जाणून घेण्यासाठी परब्रम्हाची तपस्या केली. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन प्रकटले. यावेळी भगवान विष्णूनी दर्शन दिल्यामुळे बह्माच्या डोळ्यातून अश्रू निघून ते भगवान विष्णूच्या पायावर पडताना त्याचे आवळ्यात रुपांतर झाले. त्यामुळे भगवान विष्णूंनी मला आवळ्याचे फळ प्रिय असल्याचे सांगितले. त्यामुळे मोक्षाची प्राप्ती करण्यासाठी आवळ्याची पूजा केल्याची अख्यायिका सांगितली जाते.
