Ramesh Bais Photos : राज्यपाल रमेश बैस सहकुटुंब महाबळेश्वरच्या दौऱ्यावर; वेण्णा लेकमध्ये नौका विहार
Published: May 25, 2023, 8:53 PM

सातारा: राज्यपाल रमेश बैस सोमवारपासून चार दिवस सहकुटुंब महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत. वाई येथील हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. पहिल्यांदाच सातारा दौऱ्यावर आलेल्या राज्यपालांचे प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी आणि वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी स्वागत केले. राज्यपालांनी वाईतील बेल एअर हॉस्पिटलला भेट देऊन व्यवस्थापनाकडून हॉस्पिटलमधील सुविधांची माहिती घेतली. राज्यपाल रमेश बैस यांनी महाबळेश्वर तालुक्यातील 'पुस्तकांचे गाव' भिलारला भेट दिली. पुस्तकांचे गाव देशासाठी आदर्श आहे, अशा शब्दांत भिलार गावाचा राज्यपालांनी गौरव केला. महाबळेश्वरच्या राजभवन येथील नुतनीकृत 'गिरी दर्शन' बंगल्याचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झाले. राज्यपालांनी आपल्या कुटुंबासह वेण्णा लेकमध्ये नौका विहाराचा आनंद लुटला. तसेच वेलोसिटीलाही सहकुटुंब सदिच्छा भेट दिली. महाबळेश्वर राजभवनमध्ये विभाग प्रमुखांसोबत राज्यपालांनी आढावा बैठक घेतली. आरोग्य, शिक्षणासह पायाभूत सुविधांची कामे दर्जेदार व्हावीत, अशी सूचना त्यांनी केली. पावसाचे पाणी छोट्या-छोट्या तलावांमध्ये साठवावे. प्रत्येक गावात लहान तलाव बांधून जल संधारणाची कामे करावीत, असे राज्यपालांनी आढावा बैठकीत सांगितले. राज्यपालांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये खासगी रुग्णालयांकडून करण्यात येणाऱ्या बिलांची पडताळणी करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले. कृषी प्रक्रिया उद्योगामुळे कृषी मालाला जास्तीचा भाव मिळण्यास मदत होईल. कृषी मालाची साठवणूक करून भाव चांगला मिळाल्यावर तो बाजारात विकता येईल. त्यासाठी कृषी माल साठवणुकीच्या सुविधा उभारव्यात, असेही राज्यपालांनी सूचित केले आहे.

