हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव यांचा नवा नाट्य प्रयोग, ‘छुपे रुस्तम’!

author img

By

Published : May 11, 2022, 5:08 PM IST

छुपे रुस्तम नाटकाचा पहिला प्रयोग

अभिनेते हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव यांनी आजवर प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन केले आहे. सध्या मात्र नाट्यवर्तुळात हे दोघेही ‘छुपे रुस्तम’ असल्याची चर्चा रंगली आहे. या दोघांना छुपे रुस्तम का म्हटलं जातंय, नेमकी कोणती भानगड या दोघांनी केली आहे या सगळ्याचा खुलासा येत्या १५ मे ला होणार आहे. हे दोन्ही हरहुन्नरी अभिनेते आगामी ‘छुपे रुस्तम’ या नाटकासाठी एकत्र आले आहेत.

मुंबई - लॉकडाऊन उठल्यानंतर बऱ्याच महिन्यांनंतर नाट्यगृहे पूर्ण क्षमतेने उघडली गेली. मराठी कलाकार नाटकांवर खूप प्रेम करतात आणि त्यातील काहीजण वेळात वेळ काढून रंगभूमीची सेवा करतात. त्यातीलच दोन नावं म्हणजे हृषीकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तीनही प्रांतात मुशाफिरी करत अभिनेते हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव यांनी आजवर प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन केले आहे. सध्या मात्र नाट्यवर्तुळात हे दोघेही ‘छुपे रुस्तम’ असल्याची चर्चा रंगली आहे. या दोघांना छुपे रुस्तम का म्हटलं जातंय, नेमकी कोणती भानगड या दोघांनी केली आहे या सगळ्याचा खुलासा येत्या १५ मे ला होणार आहे. हे दोन्ही हरहुन्नरी अभिनेते आगामी ‘छुपे रुस्तम’ या नाटकासाठी एकत्र आले आहेत.

छुपे रुस्तम नाटकाचा पहिला प्रयोग
छुपे रुस्तम नाटकाचा पहिला प्रयोग

शंभर टक्के खरं कधीच कोणी बोलत नसतं. प्रत्येकजण काही ना काही लपवाछपवी करत असतो. ही लपवाछपवी जर नवरा बायको मधली असेल तर मग सगळा मामला कठीण होऊन बसतो. नवरा बायकोच्या नात्यातील लपवाछपवीचा हा खेळ आणि त्यातून उडणारी तारांबळ, तारेवरची कसरत, झालेली गोची याची सगळी धमाल म्हणजे ‘छुपे रुस्तम’ हे नाटक. ‘द लाय’ या फ्रेंच नाटकावर हे नाटक बेतलं आहे. हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव या दोघांसोबत मयूरा रानडे आणि कृष्णा राजशेखर या नाटकात काम करतायेत. विनोदाचा डोस देत नवरा बायकोच्या नात्यातील अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न ‘छुपे रुस्तम’ हे नाटक करतं.

छुपे रुस्तम नाटकाचा पहिला प्रयोग
छुपे रुस्तम नाटकाचा पहिला प्रयोग

हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव ही जोडगोळी एकत्र येणार म्हणजे काहीतरी खुमासदार असणार हे वेगळं सांगायला नको. फार्स, गंमत, गॅासिप, लपवाछपवी अशा सगळ्या गोष्टींनी हे नाटक रंगत जात. खास विजय केंकरे टच असलेल्या या नाटकात काम करणे ही आमच्यासाठी पर्वणी असल्याचे हे दोघे सांगतात.

प्रिया पाटील आणि अनिता महाजन यांनी ‘छुपे रुस्तम’ नाटकाची निर्मीती केली आहे. या आधी या संस्थेच्या वतीने विविध व्यावसायिक नाट्यस्पर्धे मध्ये गाजलेलं ‘गलती से मिस्टेक’ या धम्माल विनोदी नाटकासोबत ज्वलंत, आशयघन व विनोदाची हळूवार फुंकर घालणारं ‘डोन्ट वरी हो जाएगा’ यासारख्या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. लेखक तेजस रानडे यांनी या नाटकाचे लेखन केले आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे तर संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाश योजना शीतल तळपदे यांची आहे.

प्रवेश व दिशा निर्मित आणि विजय केंकरे दिग्दर्शित हे दोन अंकी नाटक १५ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रविवार १५ मे दुपारी ४.१५ वा. दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ले येथे शुभारंभाचा आणि सोमवार १६ मे दुपारी ३.३० वा. शिवाजी मंदिर दादर येथे या नाटकाचे प्रयोग होणार आहेत.

हेही वाचा - ''बॉलिवूड मला परवडत नाही'', महेश बाबूच्या या विधानामुळे चर्चेला उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.