Sun Transit in Taurus : वृषभ संक्रांति.. पुढील एक महिना कोणत्या राशीसाठी आहे शुभ, कुणासाठी अशुभ? काय आहेत उपाय

author img

By

Published : May 15, 2022, 8:40 AM IST

Sun Transit in Taurus

आजपासून सूर्य वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे आगामी महिनाभर सर्व राशींवर त्याचा प्रभाव पडणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात पुढील एक महिना कोणत्या राशीसाठी आहे शुभ, कुणासाठी अशुभ.. काय आहेत यावर उपाय..?

नाशिक : जेव्हा वृषभ राशीत नवं ग्रहांपैकी रवी ग्रहाचा प्रवेश होतो त्यास वृषभ संक्रांत म्हटले जाते. मकर संक्रांती प्रमाणेच वृषभ संक्रांतचे पुराणात महत्व सांगितले आहे. वृषभ संक्रांतीच्या दिवशी जप, तप, दान, अनुष्ठान याला विशेष महत्व आहे. या दिवशी तीर्थ स्नान, गंगा स्नान केल्यास मानवाला लाभ होतो. वृषभ संक्रांत काळात निसर्गामध्ये अनेक बदल घडत असतात. उष्णतेची तीव्रता वाढत असते. त्यामुळे तहानलेल्यांना पाणी दान प्रत्येकांनी केले पाहिजे. पक्षी, प्राणी यांना पाण्यासाठी व्यवस्था केली पाहिजे. त्याच बरोबर ओम, राहम, रिम, राहुम, साहा सुर्याय नमः या मंत्राचा जप केला पाहिजे. या काळात मन विचार शुद्ध ठेवले पाहिजे असं महंत अनिकेत देशपांडे यांनी सांगितलं.

सूर्याचे वृषभ राशीत संक्रमण

पाहुयात पुढील एक महिना कोणत्या राशीसाठी आहे शुभ, कुणासाठी अशुभ.. काय आहेत यावर उपाय..?

मेष - आज सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल. हा संपूर्ण महिना आपल्यासाठी धन व वैभव वृद्धी करणारा आहे. असे असले तरी ह्या दरम्यान आपणास आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणाशी मतभेद वाढणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

उपाय:- रोज भगवान सूर्यास अर्घ्य द्यावा.

वृषभ - वृषभ संक्रांति पासून एक महिनाभर आपण जीवनातील अनेक समस्यांचे सहजपणे निराकरण करण्यास सक्षम व्हाल. आपला अहंकार वाढू शकतो. वैवाहिक जोडीदाराशी संवाद साधताना काळजी घ्यावी. व्यावसायिक भागीदाराशी सावधपणे संवाद साधावा.

उपाय:- एक माळ गायत्री मंत्राचा जप करावा.

मिथुन - सूर्य वृषभ राशीस असताना परदेशाशी संबंधित कामे सहजपणे होतील. आपणास कामाची नवीन संधी मिळण्याची संभावना आहे. नाते संबंध सुधारण्याची संधी मिळेल.

उपाय:- सूर्याष्टकाचे पठण करावे.

कर्क - वृषभ संक्रांति पासून एक महिनाभर आपणास सामाजिक सन्मान प्राप्त होईल. आपण नवीन लोकांच्या संपर्कात याल. या दरम्यान आपण प्राप्तीच्या साधनात वाढ करण्याचा प्रयत्न सुद्धा कराल. शासकीय कामातून आपणास लाभ संभवतो.

उपाय:- गुळाचे दान करावे तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.

सिंह - वृषभेतील सूर्य आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. या दरम्यान आपणास आपल्या व्यवसायाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक वातावरण सुखावह राहील. या दरम्यान आपणास वडिलांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील.

उपाय:- भगवान सूर्याचे पूजन करावे.

कन्या - वृषभ संक्रांति पासूनचा एक महिना आपल्यासाठी चिंतेत काहीसा भर घालणारा आहे. या दरम्यान आपणास आपल्या वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. असे असले तरी भावंडांशी आपले संबंध मधुर होतील.

उपाय:- आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे.

तूळ - सूर्य वृषभेत आल्याने आपणास अत्यंत काळजीपूर्वक राहावे लागेल. एखादा संसर्गजन्य विकार होण्याची संभावना आहे. सासुरवाडी कडील लोकांची काळजी सुद्धा घ्यावी लागेल.

उपाय:- सूर्यास कुंकू मिश्रित पाण्याचा अर्घ्य द्यावा.

वृश्चिक - सूर्य वृषभेत असता आपल्या काळजीत भर पडेल. आपला वैवाहिक जोडीदार व व्यावसायिक भागीदार यांच्याशी मतभेद संभवतात. आपणास आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवावे लागेल.

उपाय:- गायत्री चालिसाचे पठण करावे.

धनु - सूर्य वृषभेत असता आपण शत्रूंवर मात करू शकाल. या दरम्यान आपणास एखाद्या गंभीर आजारात काहीसा दिलासा मिळेल. विरोध मावळेल. आपण कर्जासाठी अर्ज करू शकता.

उपाय:- भगवान सूर्याच्या १२ नावांचे उच्चारण करावे.

मकर - सूर्याचे वृषभेतील भ्रमण आपल्यासाठी शुभ फलदायी असले तरी प्रणयी जीवनात अहंकारामुळे आपले नुकसान होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांसाठी हे भ्रमण शुभ फलदायी आहे. आपण एखाद्या नवीन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचा प्रयत्न कराल.

उपाय:- वडिलांचे आशीर्वाद घेऊन कामाची सुरवात करावी.

कुंभ - वृषभ संक्रांति पासून महिनाभर कौटुंबिक समस्यांचे निराकरण करताना आपली दमछाक होईल. या दरम्यान आपणास मातेच्या प्रकृतीची चिंता वाटू शकते. व्यवसायात एखादा नवीन प्रकल्प उभारण्याची योजना आखू शकाल.

उपाय:- भगवान सूर्यास रक्त चंदन मिश्रित पाण्याचा अर्घ्य द्यावा.

मीन - सूर्य वृषभेत असता आपल्या पराक्रमात वाढ होईल. आपले भावंडांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. आपण एखादा प्रवास सुद्धा करू शकाल किंवा एखाद्या धार्मिक प्रवृत्तीत सहभागी व्हाल.

उपाय:- रोज सूर्योदय होत असताना रामरक्षेचे पठण करावे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.