डी कंपनीच्या दोन हस्तकांना एनआयएकडून अटक, टेरर फंडिगचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता
Updated on: May 13, 2022, 11:31 AM IST

डी कंपनीच्या दोन हस्तकांना एनआयएकडून अटक, टेरर फंडिगचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता
Updated on: May 13, 2022, 11:31 AM IST
बेकायदेशीर कारवाया आणि दहशतवादी कारवायासाठी पैसे पुरवण्याप्रकरणी एनआयएने मोठी कारवाई केली आहे. एनआयएकडून अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आरिफ अबुबकर शेख (59) आणि शब्बीर अबुबकर शेख (51) या दोघांचा समावेश आहे. या दोन्ही आरोपींना आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यांची पोलिस कोठडी मागण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे डी कंपनीला मोठा हादरा बसला आहे.
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या विरोधात मुंबईमध्ये सोमवारी एनआयएकडून छापेमारी करण्यात आली होती. छापेमारी दरम्यान एनआयएला अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले. त्यानंतर 18 लोकांची एनआयएकडून सलग तिसऱ्या दिवशी देखील चौकशी करण्यात आली होती. गुरुवारी या प्रकरणात एनआयएकडून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. बेकायदेशीर कारवाया आणि दहशतवादी कारवायासाठी पैसे पुरवण्यात त्यांचा सहभाग होता असे एनआयएकडून सांगण्यात आले आहे.
आरिफ शेख, शब्बीर शेख यांना अटक - एनआयएकडून अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आरिफ अबुबकर शेख (59) आणि शब्बीर अबुबकर शेख (51) या दोघांचा समावेश आहे. या दोन्ही आरोपींना आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यांची पोलिस कोठडी मागण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे डी कंपनीला मोठा हादरा बसला आहे.
मुंबई परिसरात 29 ठिकाणांवर छापे - राष्ट्रीय तपास यंत्रणेने सोमवारी आणि मंगळवारी मुंबई परिसरात जवळपास 29 ठिकाणांवर छापे टाकले होते. हे सर्व छापे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींच्या मालमत्तांवर टाकण्यात आले होते. एनआयएने या सर्व व्यक्तींची झाडाझडती घेतली होती. त्यांची कसून चौकशी केली होती. यावेळी एनआयएने अनेक महत्त्वाचे पुरावेही जप्त केले होते. या प्रकरणी मुंबईतील एनआयए मुख्यालयात सुमारे 18 सदस्यांची चौकशी करण्यात आली आहे.
१८ जणांचा कसून चौकशी - एनआयएकडून चौकशीच्या थेट तिसऱ्या दिवशी मुंबईतील एनआयए मुख्यालयात सुमारे 18 सदस्यांची चौकशी करण्यात आली. या सर्वांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. काही जणांना घरी सोडले तर काही जण अजूनही एनआयए ऑफिसमध्येच आहेत. 18 जणांमध्ये सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट, माहीम आणि हाजी दर्ग्याचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुहेल खंडवानी, अजय गोसालिया, गुड्डू पठाण, मुनाफ शेख, अस्लम पठाणी, समीर हिंगोरिया, कय्युम शेख, आरिफ शेख आदींचा समावेश आहे.
डी कंपनीचा संबंध - दाऊद इब्राहीमशी संबंधित प्रकरणाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने फेब्रुवारी 2022 मध्ये एनआयएकडे सोपवला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे डी कंपनी आणि दाऊद इब्राहीम भारतात टेरर फंडिंग, नार्को टेरर, ड्रग्ज स्मगलिंग आणि बनावट चलनाचा वापर करण्याचं काम करत आहे. दाऊद इब्राहीम आणि डी-कंपनी लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि अल कायदा यांच्या माध्यमातून भारतात अतिरेकी कायवाया करत असल्याचंही गृह मंत्रालयाचं म्हणणं आहे. एनआयए फक्त दाऊद इब्राहीम आणि डी-कंपनीचीच चौकशी करणार नाहीये, तर छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इकबाल मिर्ची, दाऊदची बहीण हसीना पारकर यांच्याशी संबंधित घटनांचाही तपास करणार आहे.
प्रमुख आरोपींचा सातबारा...
कोण आहे सलीम फ्रुट? - सलीम फ्रुट हा छोटा शकीलचा मेहुणा आहे. शकील आपल्या गुंडांच्या माध्यमातून खंडणीचे रॅकेट चालवतो. सलीम फ्रुटला 2006मध्ये युएईमधून भारतात पाठवण्यात आले होते आणि 2010 पासून तो तुरुंगात होता. सलीम फ्रुट याची या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. सलीम फ्रूट याचा जबाब नोंदविल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. सलीम फ्रुटशिवाय दाऊद इब्राहिमचा मेहुणा सौद युसूफ तुंगेकर, दाऊदचा धाकटा भाऊ इक्बाल कासकरचा साथीदार खालिद उस्मान शेख आणि दाऊदची दिवंगत बहीण हसिना पारकरचा मुलगा आलीशान पारकर यांचेही जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. सलीम फ्रुटविरोधात मुंबईतील अनेक पोलीस स्टेशनमध्ये खंडणीच्या आरोपाखाली सहा गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षांत चीन, बँकॉक, सौदी अरेबिया, श्रीलंका आणि तुर्कस्तानसह किमान 17 ते 18 देशात सलीम फ्रुट जाऊन आला आहे.
सुहेल खांडवानी कनेक्शन काय? - अंमलबजावणी संचलनलयाच्या अटकेत असलेले महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा साथीदार सुहेल खांडवानी याच्या घरावर एनआयएने छापा टाकला आहे. सुहेल खांडवानी हा मुंबईतील माहिम आणि हाजी अली दर्ग्याचा विश्वस्त आहे. माहिममधील त्याच्या घरी पहाटेपासूनच छापेमारी सुरु आहे. याशिवाय मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित तिघांच्या ठिकाण्यांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या धाडी सुरु असल्याची माहिती आहे. सुहेल खंडवानी हा टचवूड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक आहे. नवाब मलिकांचा मुलगा फराझ मलिक हाही या कंपनीत 2006 ते 2016 या काळात संचालक होता. टचवूड कंपनी आणि कांडल्याची असोसिएट हायप्रेशर टेक्वॉलॉजी कंपनीने बीकेसी भागात 200 कोटींची जमीन खरेदी केली होती.
समीर हिंगोरा कोण? - या छाप्यात समीर हिंगोरा याचे नाव समोर आले आहे. सध्या NIAने समीर हिंगोरा याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. समीर हिंगोरा हा तो व्यक्ती आहे. ज्याने संजय दत्तला AK-56 रायफल दिली होती. संजय दत्तला शस्त्रे देण्यात या व्यक्तीची महत्त्वाची भूमिका होती. संजय दत्तला समीर हिंगोरा याच्या वाहनातून AK-56 पाठवण्यात आली होती. या प्रकरणी टाडा न्यायालयाने समीर हिंगोरा याला 9 वर्षांची शिक्षाही सुनावली होती. समीर हिंगोरा हा व्यवसायाने चित्रपट निर्माता आहे.अब्हुल कयूम कोण आहे? - एनआयने आज सकाळपासून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या जवळच्या व्यक्तींना विरोधात कारवाई सुरू केली आहे. मुंबईतील ग्रँड रोड परिसरातील अब्हुल कयूम याला आज येणार याने ताब्यात घेतले आहे. 1993 च्या मुंबईतील बॉंबस्फोट प्रकरणात येणे तपास करत आहे. तसेच अब्दुल प्रयोग याचा संबंध समोर आल्याने त्याला ताब्यात घेतले आहे.
