दसरा मेळावा - भाजपाला एक तर शिवसेनेला दुसरा न्याय, मुंबई पालिकेची दुटप्पी भूमिका, आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

author img

By

Published : Sep 21, 2022, 8:14 PM IST

Updated : Sep 21, 2022, 10:56 PM IST

दसरा मेळावा

मुंबईत दसरा मेळावा नेमके कोण घेणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. मात्र भाजपाला एक तर शिवसेनेला दुसरा न्याय दिला असल्याचे दिसून येत आहे. मुंबई पालिकेची दुटप्पी भूमिका असल्याचाही आरोप होत आहे. त्यामुळे आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पाहूयात सविस्तर वृत्तांत.

मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळावावरून सध्या राजकीय वाद सुरू आहे. शिवसेनेच्या फुटीमुळे पालिकेने यंदाचा दसरा मेळावा करण्यासाठी कोणाला परवानगी द्यावी यावर निर्णय घेतलेला नाही. यामुळे शिवसेनेने कोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र या सर्व प्रकरणात मुंबई महानगरपालिकेची दुटप्पी भूमिका समोर आली आहे. जांभोरी मैदान भाजपाला दहीहंडीसाठी देताना जो न्याय लावला त्याचप्रमाणे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून शिवाजी पार्कसाठी पहिला अर्ज आल्यावर त्यांना परवानगी का देण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे पालिकेच्या आणि पालिका आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

दसरा मेळावा परवानगी वाद कोर्टात - मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. शिवसेनेत फूट पडल्याने ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांकडून शिवाजीपार्क मैदानावर दसरा मेळावा करण्यासाठी पालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. पालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडे २२ ऑगस्टला शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी उद्धव ठाकरे गटाकडून तर ३० ऑगस्ट रोजी सदा सरवणकर यांनी शिंदे गटाकडून अर्ज केला आहे. गेला महिनाभर पालिकेने कोणाला परवानगी द्यावी यावर निर्णय घेतलेला नाही. यामुळे अखेर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.


भाजपा आणि शिवसेनेला वेगळा न्याय - राष्ट्रवादीचे माजी मंत्री व सध्या शिवसेनेत असलेले आमदार सचिन अहिर हे दरवर्षी वरळी जांभोरी मैदानात दहिहंडीचे आयोजन करत होते. कोरोनामुळे गेले दोन वर्षे अहिर यांनी दहीहंडीचे आयोजन केले नव्हते. यावर्षी या मैदानावर भाजपा नेते व माजी मंत्री आशिष शेलार यांनी अर्ज केल्यावर त्यांना परवानगी देण्यात आली. शिवसेनेकडून यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यावर शेलार यांचा अर्ज पहिला आल्याचे स्पष्टीकरण पालिकेकडून देण्यात आले होते. दादर शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा साजरा करण्यासाठी ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटाकडून परवानगी मागण्यात आली आहे. भाजपाला ज्या प्रमाणे पहिला अर्ज केला म्हणून जांभोरी मैदानावर परवानगी देण्यात आली त्याच धर्तीवर उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा करण्यासाठी परवानगी द्यायला हवी. शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी बीकेसीमधील मैदान मिळाले आहे. यामुळे ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदान द्यायला हवे अशी प्रतिक्रिया पालिकेतील वरिष्ठ पत्रकार सुनील शिंदे यांनी दिली.


याआधी अर्ज विधी विभागाकडे पाठवला नाही - दसरा मेळावा शिवाजी पार्कवर साजरा करण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाने पहिला अर्ज केला आहे. यामुळे आम्हाला परवानगी मिळालीच पाहिजे. पालिकेने विधी विभागाकडे हा अर्ज का पाठवला हा प्रश्न आहे. याआधी असे कधी झाले नाही. कोणताही अर्ज विधी विभागाकडे अभिप्रायासाठी पाठवला नाही मग आताच काय झाले असा प्रश्न मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल हे राज्य सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.


शिवसैनिकांना अडकवण्याचा प्रयत्न - राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली पाहिजे अशी स्थिती निर्माण केली ( Sinde Bjp group try to trap ShivSainik ) जातेय. येणा-या निवडणूकीत शिवसेनेचे चांगले चेहरे अडकवून ठेवले जावेत याकरता कायदा व सुव्यवस्था बिघडवली जात आहे. शिवसैनिकांना उकसवण्याचे प्रयत्न होत आहेत. हे प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोखू ( Chief Minister Eknath Shinde) शकतात. मात्र भाजपाला हे करायचे नाही यामुळे जे होईल ते बघून घेवू. पण कोर्टावर आमचा विश्वास आहे, कोर्ट योग्य निर्णय घेईल असे पेडणेकर म्हणाल्या.


काय आहे वाद - दादर शिवाजी पार्क येथे गेले ५६ वर्षे शिवसेनेचा दसरा मेळावा होत आला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता असे. बाळासाहेबांच्या निधनानंतरही शिवसेनेचा दसरा मेळावा ठरल्याप्रमाणे होत आहे. २०१२ नंतर उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे यापूर्वी मेळाव्यासाठी परवानगीसाठीचा अडथळा कधीही समोर आलेला नाही किंवा त्याची चर्चाही झालेली नाही. यावेळी मात्र राजकीय समिकरण बदलले आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर राजकीय चित्र बदलून गेले आहे. फुटलेला शिंदे गट आपण शिवसेनाच असल्याचा दावा करीत आहे. उद्धव ठाकरे गटाकडून परवानगीसाठी अर्ज केल्यावर शिंदे गटात सामिल झालेले स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी शिवाजी पार्क येथेच दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्याबाबत महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडे केला आहे. २२ ऑगस्टला शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी उद्धव ठाकरे गटाकडून तर ३० ऑगस्ट रोजी सदा सरवणकर यांनी शिंदे गटाकडून अर्ज केला आहे. या अर्जावर पालिकेने निर्णय घेतलेला नसल्याने शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Last Updated :Sep 21, 2022, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.