राज्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, दुर्घनेतील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर

author img

By

Published : Jul 23, 2021, 7:37 PM IST

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून राज्यातील पूर परिस्थितीबाबत आढावा बैठक

कोकणातील चिपळूण, रायगड परिसरात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. दरम्यान, राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. तसेच, जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासनामार्फत करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला, त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

मुंबई - राज्यात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील चिपळूण, रायगड परिसरात भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. रस्ते, पूल पाण्याखाली गेल्याने बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. आणखी एक-दोन दिवस अशीच परिस्थिती राहील, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच, यामध्ये जखमी झालेल्या सर्व व्यक्तींच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला, त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, प्रशासनाने खबरदारी घेऊन उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.

'नौदल, तटरक्षक दल आणि आपत्ती निवारण पथकाच्या तुकड्या मदतीला'

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कोकणाला झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. अनपेक्षित असे संकट राज्यावर ओढवले आहे. राज्यातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही संपर्क साधला असून, पंतप्रधानांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार नौदल, तटरक्षक दल आणि आपत्ती निवारण पथकाच्या तुकड्या राज्यात पोहोचल्या आहेत, असे ठाकरे म्हणाले.

'पावसाचे संकट अनपेक्षित'

राज्यात धो-धो पाऊस कोसळत असल्याने धरणे, नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक भाग पाण्याखाली गेल्याने, परिस्थिती चिंताजनक आहे. जीवितहानी होऊ नये, यासाठी शासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. एनडीआरएफ, आर्मी, हवाई दलामार्फत बचावकार्यही सुरु आहे. दुसरीकडे महाड येथे दरड कोसळून सुमारे ३५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनेक कुटुंब दरडीखाली अडकले. त्यांना बाहेर काढण्याचेही काम युध्द पातळीवर सुरु आहे. नागपूर, किनारपट्टी, महाबळेश्वर भागातही जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाचे हे अनपेक्षित संकट असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

'ढगफुटीचा अंदाज वर्तवता येत नाही'

ढगफुटीचा नेमका अंदाज कोणालाही वर्तवता येत नाही. त्यामुळे ढगफुटी नेमक्या कोणत्या भागात होईल, हे माहिती नसते. कोकणात अनेक भागांमध्ये पुरामुळे रस्ते खचले आहेत. एनडीआरएफ'च्या पथकांनाही त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अडथळे येत आहेत. या आस्मानी संकटाशी मुकाबला करत सगळ्यातून मार्ग काढत, पथके त्या ठिकाणी पोहोचवली जात आहे. पूरस्थितीत अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले जात आहे. अन्नांची पाकिटे, कपडे, ओषधे पुरविण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

'कोरोना आणि पुराचे दुहेरी संकट'

राज्यातील कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. ज्या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे त्याच ठिकाणी पूर आला आहे. सर्वप्रथम जीवितहानी होऊ न देण्याचे काम सुरु आहे. पूर ओसरलेल्या भागात रोगराई पसरणार नाही, यासाठी त्याठिकाणी औषधे पोहोचवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे. पाणी ओसरत जाईल, तशी मदत केली येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.

'एनडीआरएफ'च्या तुकड्या तैनात'

एनडीआरएफच्या एकूण १४ तुकड्या नेमून दिलेल्या जिल्ह्यांत पोहचल्या आहेत. पालघर १, ठाणे २, रायगड २, रत्नागिरी ४, सिंधुदुर्ग १, सांगली १, सातारा १, कोल्हापूर २, एसडीआरएफ'च्या नागपूरसाठी २ आणि या रायगड जिल्ह्यासाठी २ अशा ४ तुकड्या बचाव कार्य करीत आहेत. याशिवाय पोलादपूर करिता एनडीआरएफची १ टीम मुंबई येथून हवाई मार्गे पाठविण्यात आली आहे. तटरक्षक दलाच्या २, नौदलाच्या २ तुकड्या रत्नागिरी येथे बचाव कार्य करीत आहेत. राखीव तुकड्या अंधेरी येथे - २, नागपूर येथे १, पुणे येथे १, एसडीआरएफ धुळे येथे १, आणि नागपूर येथे १ अशा तैनात करण्यात आल्या आहेत. दुपारपर्यंत एनडीआरएफच्या ८ अतिरिक्त तुकड्या भूवनेश्वर येथून येत आहेत.

'बचाव कार्य वेगाने'

आज सकाळपर्यंत प्राप्त माहितीनुसार बचाव कार्याव्दारे चिपळूण येथून ५०० लोकांना वाचविण्यात आले. चिपळूण येथे ४ निवारा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. कोल्हापूर-पन्हाळा रोड येथे पूराच्या पाण्यात बसमध्ये अडकलेल्या २२ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. महाड येथे हवाई दलाच्या हॅलिकॉप्टरने केलेल्या हवाई पाहणीनूसार पाणी पातळी कमी होताना दिसते. खेड जि. रत्नागिरी या ठिकाणी भूस्खलनामूळे ७-८ कुटूंबे बाधीत झाले आहेत. या घटनेत १० व्यक्ती जखमी झाले असून, १० ते १५ लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. येथेही एनडीआरएफच्या मदतीने शोध व बचाव कार्य सूरू करण्यात आले आहे.

दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत

राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. तसेच, जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासनामार्फत करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. दरम्यान, कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. रायगड जिल्ह्यात महाड येथील तळीये, मधलीवाडी गोवेले, साखर सुतारवाडी, पोलादपूर येथील केवनाळे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून हे मृत्यू झाले आहेत.

'अन्न व कपडे गरजेनुसार वाटप'

वशिष्टी नदीवरील चिपळूण व मुंबई यांना जोडणारा पूल कोसळल्यामूळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली आहे. महाड माणगांव येथे 2000 लोकांची निवासाची सोय करण्यात आली आहे. तसेच, पूरग्रस्तांना अन्न व कपडे गरजेनुसार पुरविण्यात येत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह भागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकूमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे आदी अधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.