महाविकास आघाडी सत्तेत असतानाही पोटनिवडणुकीत भाजपचा वरचष्मा!

author img

By

Published : Sep 27, 2021, 7:44 PM IST

file photo

भाजपने राज्यसभेच्या हिंगोली मतदारसंघाच्या पोट निवडणुकीतून माघार घेतली आहे. मात्र, राज्यात मागील दोन वर्षात झालेल्या राज्यसभा, लोकसभा, महापालिका, नगरपालिका, नगर परिषदेच्या पोट निवडणुकीत भाजपचा वरचष्मा राहिला आहे.

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका तोंडावर आल्या असतानाच, भाजपने राज्यसभेच्या हिंगोली मतदारसंघाच्या पोट निवडणुकीतून माघार घेतली आहे. मात्र, राज्यात मागील दोन वर्षात झालेल्या राज्यसभा, लोकसभा, महापालिका, नगरपालिका, नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा वरचष्मा राहिला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असतानाही भाजपने पालघर लोकसभा आणि पंढरपूर विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून सरकारला हादरा दिला आहे.

  • भाजपचे पारडे जड -

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कट्टर विरोधक असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. किमान समान कार्यक्रम यावेळी तयार करण्यात आला. युतीतील भागीदारांमधील वैचारिक अंतरामुळे सरकार टीकणार नाही, असे सूर भाजपच्या नेत्यांकडून सुरू होते. सरकार पाच वर्षे टीकेल, असा दावा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केला. राज्यातील लोकसभा, राज्यसभा, महानगर पालिका, नगरपालिका, नगर परिषदांमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, गेल्या दोन वर्षात झालेल्या विविध निवडणुकांमध्ये भाजपचे पारडे राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

  • निवडणूक बिनविरोध -

काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. काँग्रेसकडून रजनी पाटील तर भाजपकडून संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज भरला. महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही पाटील यांना पाठिंबा दिला. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध करण्याचा आग्रह काँग्रेस नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरला. आज भाजपने उपाध्याय यांचा अर्ज मागे घेत, ही निवडणूक बिनविरोध केली आहे.

हेही वाचा - अघोरी कृत्य.. वाईजवळ अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत नेऊन पूजनाचा प्रकार, मांत्रिक फरार

  • गावितांनी मारली बाजी -

२०१८ पर्यंत भाजप-सेना यांच्यात वादावादी सुरू झाली होती. अचानक पालघरचे भाजपचे खासदार अ‍ॅड. चिंतामण वणगा यांचे आकस्मिक निधन झाले आणि त्या ठिकाणी पोट निवडणुकीत शिवसेनेने वणगा यांचा मुलगा श्रीनिवास वणगा यांना संपर्क करून त्यांना शिवसेनेची लोकसभेची उमेदवारी दिली. सहानुभूतीपोटी श्रीनिवास वणगा जिंकतील, असे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी भाजपची गोची झाली. भाजपकडे पर्यायी उमेदवार नव्हता, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी थेट काँग्रेसचे नेते राजेंद्र गावित यांना संपर्क करून पोटनिवडणुकीत त्यांना उमेदवारी देऊन सर्व ताकदीनिशी गावित यांना निवडून आणले होते. गावितांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे विजय मिळाला असला तरी भाजपचे पारडे येथे जड असल्याचे दिसून आले.

  • भाजपचे अवताडे महाविकास आघाडीला पडले भारी -

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात ही पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीने भालके यांचा मुलगा भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली होती. भाजपने समाधान आवताडे यांना संधी दिली. महाविकास आघाडी विरोधात भाजप अशी लढत असल्याने सुरुवातीला अटीतटीची होणार असे वाटले होते. भाजपच्या आवताडे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला.

  • लोकसभेतही भाजपचा भगवा -

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ असला, तरी 2014 साली नाना पटोलेंनी भाजपमध्ये प्रवेश करुन, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर विविध मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर नाराज होत, नाना पटोले यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, नाना पटोले या मतदारसंघातून लढण्याऐवजी नागपुरातून गडकरींविरोधात लढले. त्यामुळे आघाडीकडून इथून नाना पंचबुद्धे रिंगणात उतरले. तर सुनील मेढें हे भाजपकडून लढले. भाजपच्या मेढें यांनी निवडणुकीत विजय मिळवत भगवा फडकावला.

  • पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी फेल -

राज्यातील पदवीधर मतदारसंघ आतापर्यंत भाजपचे बालेकिल्ले होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून त्यांना सुरुंग लावण्यात आले. नाशिक पदवीधर मतदारसंघ डॉ. सुधीर तांबे यांनी भाजपकडून हिसकावून घेतला. तर सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ भाजपकडून काढून घेतला. चव्हाण यांनी तिसर्‍यांदा विजय मिळवून हॅटट्रीक केली. त्याअगोदर भाजपचे नेते जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत हातात घड्याळ बांधले. भारतीय जनता पक्षाने एक जागा जिंकली, तर दोन जागा गमावल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीला फायदा झाल्याचे दिसत नाही.

हेही वाचा - हलाखीच्या परिस्थितीत मुलाने UPSC परीक्षेत मिळवलेले यश पाहून वडिलांच्या डोळ्यांत तरळले अश्रू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.