CM DCM Meet Amit Shah : शिंदे-फडणवीसांची 'दिल्लीवारी'; राज्यपाल पदमुक्त, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा? शिंदे म्हणाले...
Updated on: Jan 24, 2023, 6:57 PM IST

CM DCM Meet Amit Shah : शिंदे-फडणवीसांची 'दिल्लीवारी'; राज्यपाल पदमुक्त, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा? शिंदे म्हणाले...
Updated on: Jan 24, 2023, 6:57 PM IST
सध्या राज्यासह दिल्लीतील राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. राज्यपाल पदमुक्त, मंत्रिमंडळ विस्तार, सहकार क्षेत्र अशा अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या चर्चेला अजून कुठलाही दुजोरा मिळालेला नाही.
नवी दिल्ली - दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाचे महाराष्ट्रातील नेते एकत्र आले होते. अमित शाह यांनी बोलावलेल्या सहकार क्षेत्रासंबंधीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. यावेळी भाजपाचे इतर नेतेही हजर असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पद सोडण्याची इच्छा आणि मंत्रिमंडळ विस्तार या विषयांवर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
On behalf of Maharashtra, I'd like to thank the Minister of Cooperation Amit Shah. He has taken up sugar industry very seriously. There should be margin money, working capital, loan restructuring & strengthening of primary agriculture societies: Maha CM Eknath Shinde, in Delhi pic.twitter.com/0F6swDQeLf
— ANI (@ANI) January 24, 2023
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया - साखर उद्योगाला बळकटी व सक्षम करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्रातील साखर उद्योग आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. महाराष्ट्राच्यावतीने मी सहकार मंत्री अमित शाह यांचे आभार मानू इच्छितो. त्यांनी साखर उद्योग अतिशय गांभीर्याने घेतला आहे. मार्जिन मनी, खेळते भांडवल, प्राथमिक कृषी संस्थांचे कर्ज पुनर्गठन आणि बळकटीकरण असावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्यपाल पदमुक्त विषय - आपल्या वादग्रस्त वक्तव्याने राज्याच्या राजकारणात धुरळा उडवून देणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त करण्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. कोश्यारी आणि वाद असे समीकरणच गेल्या काही दिवसांपासून बनले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर विरोधकांनी त्यांना पदावरून हटवण्याची वारंवार मागणी केली होती. राज्यपालांच्या वक्तव्याने भाजपचीही कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात त्यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या विषयावर देखील आज दिल्लीत अमित शाह, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
मंत्रिमंडळ विस्तार विषय - मंत्रिमंडळ विस्तारावरून देखील महाविकास आघाडी सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहे. त्यामुळे सध्या मंत्रिमंडळ विस्तार चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुतोवाच केले होते. एका मंत्र्यांवर अनेक खात्याची जबाबदारी आहे, अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची देखील जबाबदारी आहे. विशेषतः अधिवेशन काळात विधानसभा आणि विधानपरिषदेत उत्तर देताना मंत्र्यांची बरीच धावपळ होते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास चांगलेच होईल, असे एका कार्यक्रमात फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे आजच्या दिल्लीवारीत याविषयावर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
बच्चू कडुंचे टोमणे - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार अशा चर्चा रंगत असल्या तरी अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी यासंदर्भात मोठे विधान केले होते. या सरकारकडून मंत्रिमंडळ विस्ताराच्या अपेक्षा नाहीत. 2024 पर्यंत काही होणार नाही, असे नाराज उद्गार कडू यांनी मुंबईत ईटीव्ही भारतशी बोलताना काढले होते. त्यामुळे सध्या मंत्रिमंडळ विस्तार हा हॉट विषय बनला आहे.
हेही वाचा - Bacchu Kadu On Cabinet Expansion : 2024 पर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त नाही; आमदार बच्चू कडू
