Breaking News : कर्नाटकात जाण्यावर कोणतेही बंधन नाही - बेळगाव पोलीस अधीक्षक

author img

By

Published : Dec 7, 2022, 6:39 AM IST

Updated : Dec 7, 2022, 7:52 PM IST

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

19:49 December 07

कर्नाटकात जाण्यावर कोणतेही बंधन नाही - बेळगाव पोलीस अधीक्षक

बेळगाव - जिल्ह्यात कोणत्याही अनुचित प्रकाराची नोंद नाही. सर्वकाही सुरळीत सुरू आहे, असे बेळगावच्या पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. तसेच कर्नाटकात जाण्यावर कोणतेही बंधन नाही, असेही ते म्हणाले आहेत. बेळगाव जिल्ह्यात मंदिरात येणाऱ्या भाविकांची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असेही त्यांनी सांगितले.

19:35 December 07

ट्रान्सजेंडर्ससाठी गृह विभागाच्या नोकरीच्या अर्जात तरतूदीच्या MAT आदेशास हायकोर्टाची सहमती

मुंबई - मुंबई हायकोर्टाने ट्रान्सजेंडर्ससाठी महाराष्ट्र गृह विभागाच्या नोकरीच्या अर्जात तरतूद करण्याच्या MAT आदेशास प्रथमदर्शनी सहमती व्यक्त केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात याबाबत आज सुनावणी झाली. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (एमएटी) राज्य सरकारला गृह विभागांतर्गत पदांसाठीच्या अर्जात ट्रान्सजेंडरसाठी तरतूद तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्याला राज्यसरकारने हायकोर्टात आव्हान दिले होते. त्यावर हायकोर्टाने हे निरीक्षण नोंदवले आहे.

19:13 December 07

कोर्टात हजर होताना सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी गणवेशात असायला हवे - हायकोर्ट

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले की, सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या गणवेशात कोर्टात हजर राहावे. एका वकिलाने महिला पोलिस कर्मचाऱ्याने परिधान केलेल्या साध्या पोशाखाकडे लक्ष वेधल्यानंतर ही सूचना करण्यात आली. न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि पी डी नाईक यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद करताना वकील सुभाष झा म्हणाले की, न्यायालयात येणारे पोलीस अधिकारी न्यायालयीन शिष्टाचाराचे पालन करत नाहीत. ते सामान्य नागरी कपडे घालून आलेले दिसतात. त्यानंतर कोर्टाने हे फर्मान सोडले.

19:05 December 07

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा टाइम मॅगेझिनने केला गौरव - पर्सन ऑफ द इयर 2022 घोषित

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना जगप्रसिद्ध नियतकालिक टाइमने पर्सन ऑफ द इयर 2022 घोषित केले आहे. टाइम मासिकाने आपल्या ताज्या अंकात राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना कव्हर पेजवर स्थान दिले आहे. रशिया-युक्रेन युद्धात राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे गेल्या 10 महिन्यांपासून रशियाच्या विरोधात जोरदार आवाज उठवत आहेत. जवळपास 10 महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात झेलेन्स्की संयम आणि गांभीर्याने युक्रेनपेक्षा कितीतरी पटींनी मोठ्या रशियन सैन्याचा सामना करणाऱ्या आपल्या सैनिकांसोबत उभे आहेत.

18:55 December 07

चाकूचा धाक दाखवून ट्रेनमधील प्रवाशांना लुटणाऱ्या सहा जणांना अटक

ठाणे - कसारा आणि कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान देवगिरी एक्सप्रेस ट्रेनमधील प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. ही घटना मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेस ट्रेनमध्ये घडली, असे त्यांनी सांगितले.

18:34 December 07

गुजरात विधानसभा निवडणुकीची उद्या सकाळी 8 वाजता 37 केंद्रांवर मतमोजणी

गांधीनगर - गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या सकाळी 8 वाजता 37 केंद्रांवर मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असेल असे गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिकारी पी. भारती यांनी सांगितले आहे.

18:26 December 07

मॅनहोलमध्ये पडून मृत्यू किंवा जखमी झाल्यास महापालिका अधिकारी जबाबदार - हायकोर्ट

मुंबई - शहरामध्ये रस्त्याच्या किनाऱ्यावर असलेले उघडे मॅनहोल पावसाळ्यात मृत्यूचा सापळा ठरत असतात. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी झाली. यावेळी त्यांनी महापालिकेला फटकारले आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी म्हटले की मॅनहोलमध्ये पडून मृत्यू किंवा जखमी झाल्यास त्याला महापालिका अधिकारी जबाबदार धरले जातील.

18:22 December 07

देशमुख यांच्या जामीन अर्जावर आजची सुनावणी तहकूब

मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आजची सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. आता उद्या दुपारी 4 वाजता पुन्हा पुढील सुनावणी होईल.

18:18 December 07

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कारवाईची ग्वाही दिली - मुख्यमंत्री शिंदे

मुंबई - कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई त्यांच्याशी कर्नाटक सीमेवर होणाऱ्या हिंसाचाराबद्दल चर्चा झाली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यांनी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

17:37 December 07

सोलापुरात कर्नाटकच्या बसवर आणि सीएम बोम्मई यांच्या फोटोवर काळे फासले

सोलापूर - कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नी दोन्ही राज्यांमध्ये सीमा भागात आंदोलने होतच आहेत. सोलापुरातील स्थानिक संघटनांनी कर्नाटकच्या बसवर आणि सीएम बोम्मई यांच्या फोटोवर काळे फासले.

17:09 December 07

पांगरी-गोपीनाथगड राष्ट्रवादीच्या ताब्यात, सरपंचपदासह 11 पैकी 10 जागा बिनविरोध

बीड - ग्रामपंचायत निवडणूक 2022 मध्ये माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात ज्येष्ठ नेते वाल्मिक कराड यांनी आखलेल्या रणनीतीमध्ये परळी तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी पांगरी-गोपीनाथगड ग्रामपंचायत निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात बिनविरोध आली आहे. सरपंचपदी सुशील वाल्मीकराव कराड यांच्यासह 11 पैकी 10 सदस्य आज निवडणूक फॉर्म काढून घेण्याच्या अखेरच्या क्षणी बिनविरोध ठरले आहेत. यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा परळी मतदारसंघात आपले वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे.

16:56 December 07

नोटाबंदी निर्णयासंदर्भात 10 डिसेंबरपर्यंत सर्व संबंधितांना म्हणणे मांडण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश

नवी दिल्ली - नोटाबंदी संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने सर्व पक्षकारांना येत्या 10 डिसेंबरपर्यंत म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेकडून नोटाबंदीच्या निर्णयाशी संबंधित फाईली कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व कागदपत्रे न्यायालयास देण्यात येतील, असे ॲटर्नी जनरल वेंकटरमणी यांनी घटनापीठास सांगितले. यावर पुढील सुनावणीमध्ये न्यायालय काय भूमिका घेते ते आता महत्वाचे ठरणार आहे.

16:44 December 07

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न - देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन

मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला आहे. तसेच राज्यातील परिस्थिती शहा यांच्या कानावर घातली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर शरद पवार यांनी आपल्याला बेळगावात जावे लागेल असे वक्तव्य केले होते. त्यानंतर वातावरण निवळवण्यासाठी आता हालचालींना वेग आला आहे.

16:42 December 07

अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय प्रकरणात दाखल जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे.

16:36 December 07

न्‍यायप्रविष्‍ठ प्रश्‍नावर बोलताना ज्येष्‍ठ नेते शरद पवार यांनीही भान ठेवले पाहिजे - वि‍खे पाटील

अहमदनगर - महाराष्‍ट्र कर्नाटक सीमा प्रश्‍न हा सर्वोच्‍च न्‍यायालयात प्रलंबित आहे. मात्र महाराष्‍ट्राचे नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री घेत आहेत. परंतु या विषयाला खतपाणी घालून राजकीय पोळी भाजण्‍याचे काम महाविकास आघाडीचे सुरू असल्‍याची टिका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. न्‍यायप्रविष्‍ठ प्रश्‍नावर ज्येष्‍ठ नेते शरद पवार यांनीही बोलताना भान ठेवले पाहिजे अशी अपेक्षा वि‍खे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्‍यक्‍त केली.

15:51 December 07

दिल्लीकरांसाठी काम करण्याकरता भाजप आणि काँग्रेसचे सहकार्य हवे - केजरीवाल

नवी दिल्ली - आता दिल्लीसाठी काम करण्यासाठी मला भाजप आणि काँग्रेसचे सहकार्य हवे आहे, असे मत विजयानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मांडले आहे. मी केंद्राला आवाहन करतो आणि दिल्ली चांगली करण्यासाठी पंतप्रधानांचे आशीर्वाद मागतो, असे ते म्हणाले आहेत. आपल्याला एमसीडी भ्रष्टाचारमुक्त करायची आहे. आज दिल्लीच्या जनतेने संदेश दिला आहे. असेही केजरीवाल म्हणाले.

15:40 December 07

मुंबई हायकोर्टाचे नाव बदण्याचा मुद्दा भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी मांडला लोकसभेत

मुंबई हायकोर्टाचे नाव बदलून महाराष्ट्र हायकोर्ट करण्याचा मुद्दा भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी आज लोकसभेत उपस्थित केला. संसदेने निर्णय घ्यायचा असल्याने सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणावर विचार करण्यास नकार दिला आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे याबाबत आता संसदेनेच पुढाकार घेऊन नामांतराचा निर्णय घेतला पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली.

14:47 December 07

राज्यपालांच्या खुर्चीला रेलून मॉडेलचे फोटोसेशन, मनसेचा राज्यपालांंच्या प्रतिष्ठेबद्दल सवाल

मनसे नेते मनोज चव्हाण यांनी ट्विट करुन एक अजब सवाल केला आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात की, 'ठीकाण राजभवनही बाई कोण ? अभिनेत्री आणि माॅडेल राजभवनात काय करतेय ?राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही ?' या ट्विटमध्ये एका महिलेचा राज्यापालांच्या खुर्चीला रेलून उभा राहिलेला फोटो दिसतो. ही महिला म्हणजे मॉडेल मायरा मिश्रा असल्याचे सांगण्यात येत आहे.

14:28 December 07

सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांची माहिती आता मोबाईलवर मिळणार

नवी दिल्ली - सरन्यायाधीशांनी 'सर्वोच्च न्यायालय मोबाईल अॅप 2.0' लाँच करण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की याचा सर्वसामान्यांना माहिती मिळण्यासाठी उपयोग होईल. तसेच कायदा अधिकारी, सरकारी विभागांना खटल्यांचा मागोवा घेण्यासही त्याचा चांगला उपयोग होईल.

14:17 December 07

अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई - विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. कर्नाटक सीमावाद मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करणार आहेत. राज्य सरकारकडून वादावर ठोस भूमिका घेण्यासाठी अजित पवार विनंती करणार आहेत.

13:34 December 07

नाशकात कर्नाटक बँकेच्या बोर्डाला काळे फासले

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद नाशिकमध्ये सुद्धा उमटले. शहरातील कर्नाटक बँक समोर स्वराज्य संघटनेने आंदोलन केले आहे. तसेच बँकेच्या बोर्डाला काळं फासण्यात आले. नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या कर्नाटक बँकेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटक सरकारसह कन्नड रक्षण वेदिका संघटनेविरोधात रोष व्यक्त केला आहे.

13:04 December 07

एमसीडी निवडणुकीत AAP ला 107 जागा जिंकून निर्णायक बहुमत

नवी दिल्ली - एमसीडी निवडणुकीत AAP ने 107 जागा जिंकून मारली बाजी. निर्णायक बहुमत मिळाल्याने आता फक्त इतर जागांच्या निकालाची औपचारिकता बाकी.

12:27 December 07

सीमा प्रश्न ठाकरेंनी का सोडवला नाही - चंद्रकांत बावनकुळे

मुंबई - शिंदे फडणवीस सरकार सक्षम सरकार आहे, असे सांगून सीमा प्रश्न ठाकरेंनी का सोडवला नाही असा सवाल चंद्रकांत बावनकुळे यांनी केला. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने जनतेशी खेळू नये. गाड्या फोडणे ही लोकशाहीची लक्षणे नाहीत. महाराष्ट्र सरकारने कोर्टात लवकर सुनावणी घ्यावी आणि प्रकरण निकाली काढावे अशी भूमिका आहे. सीमा भागात तणाव निर्माण करू नये असेही ते म्हणाले.

12:04 December 07

एमसीडी निवडणुकीत AAP ची 75 जागा जिंकून आघाडी

नवी दिल्ली - एमसीडीची मतमोजणी सुरू असताना AAP ने 75 जागा जिंकून आघाडी घेतली आहे तसेच 60 जागांवरील उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजपने 55 जागा जिंकल्या आहेत. त्यांनी 48 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत. तर 5 जागांवर आघाडी घेतली आहे. 1 अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे आणि 2 आघाडीवर आहेत.

11:45 December 07

उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी राज्यसभा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला

नवी दिल्ली - उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी आज राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच धनखर हे अध्यक्षपद भूषवत आहेत.

11:07 December 07

देशाला जी २० अध्यक्षपद हा मोठा सन्मान- पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत नवीन उपसभापतींचे स्वागत केले.

11:06 December 07

संजय राऊतांनी आपले तोंड आवरावे-शंभूराजे देसाई

संजय राऊतांनी आपले तोंड आवरावे, असा टोला शंभूराजे देसाई यांनी लावला आहे.

10:30 December 07

भारताला जी २० चे अध्यक्षपद मिळणे ही मोठी गोष्ट-पंतप्रधान नरेंद्र मोदी

हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. हे महत्त्वाचे आहे कारण आम्ही 15 ऑगस्टपूर्वी भेटलो होतो. आम्ही अशा वेळी भेटत आहोत जेव्हा भारताला G20 च्या अध्यक्षतेची संधी मिळाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. ज्या पद्धतीने भारताने जागतिक समुदायात स्थान निर्माण केले आहे, ज्या पद्धतीने भारताकडून अपेक्षा वाढल्या आहेत आणि ज्या पद्धतीने भारत जागतिक व्यासपीठावर आपला सहभाग वाढवत आहे, अशा वेळी भारताला जी २० चे अध्यक्षपद मिळणे ही मोठी गोष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

09:02 December 07

महिलांना अन्नातून विषबाधा, 34 महिला रुग्णालयात दाखल

अंबाजोगाई तालुक्यात गीत्ता या गावात घरगुती कार्यक्रमानिमित्त गावातील महिलांना जेवणाचे निमंत्रण दिले असता या जेवणामध्ये विषबाधा झाल्याने गीत्ता या गावातील 34 महिलांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालय येथे दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. वैद्यकीय टीमने अतोनात प्रयत्न करून धोक्याच्या बाहेर काढले आहे.

08:53 December 07

दिल्ली महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजप 55 जागांवर आघाडीवर

दिल्ली महानगरपालिकेत 250 प्रभागांची मतमोजणी सुरू आहे. भाजप 55 जागांवर, आप 20 आणि काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर आहे.

08:09 December 07

शूटिंगच्या नावाखाली फ्लॅटमध्ये लैंगिक अत्याचार, एका आरोपीला अटक

29 नोव्हेंबर रोजी एका महिलेने केलेल्या एफआयआरच्या आधारे, शूटिंगच्या नावाखाली फ्लॅटमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केले गेले. एका आरोपीला अटक केली. इतर तीन आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पोलीस आयुक्त अजय कुमार बन्सल यांनी सांगितले.

07:36 December 07

सैन्यदलातील जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट के. सी. पंचनाथन यांचे निधन

भारतीय लष्कराचे 101 एरिया जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल केसी पंचनाथन यांचे आज शिलाँग येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

07:05 December 07

डोनाल्ड ट्रम्प सापडले अडचणीत, समोर मोठा घोटाळा येण्याची शक्यता

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या मालकीच्या दोन कंपन्या कर फसवणुकीत दोषी आढळल्या आहेत.

06:34 December 07

दिल्ली महानगरपालिकेतील 250 प्रभागांसाठी आज होणार मतमोजणी

दिल्ली महानगरपालिकेतील 250 प्रभागांसाठी आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे

06:26 December 07

Breaking News : नाशकात कर्नाटक बँकेच्या बोर्डाला काळे फासले

मुंबई : महापालिकेकडून खड्डेमुक्त मुंबईसाठी नवीन सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे काम हाती घेतले आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व रस्ते सिमेंट क्राँक्रिटच्या रस्त्यांमध्ये रुपांतरीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. डांबरी मास्टिंग रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमध्ये रुपांतर केले जाणार आहे. हे रस्ते मजबूत, गुळगुळीत व टीकाऊ राहतील यावर भर दिला जात आहे. त्यामुळे नव्या रस्त्यांवर एजन्सींना खोदकामासाठी पालिकेने मज्जाव केला आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.

Last Updated :Dec 7, 2022, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.