महाराष्ट्र

maharashtra

सांगलीच्या वैभवात भर घालणाऱ्या 'आयर्विन पुला'ला 92 वर्षे पूर्ण

By

Published : Nov 20, 2021, 12:00 PM IST

आयर्विन पूल

कृष्णा नदी काठी वसलेल्या सांगली शहराची ओळख आज अनेक कारणांनी आहे. मग ती इथल्या हळद, द्राक्ष, नाट्य, साहित्य, कुस्ती, राजकारण असो किंवा अन्य गोष्टी. हे सर्व समृद्ध बनवण्यात सांगलीच्या कृष्णा नदीच्या बरोबर "आयर्विन" पुलाचेही मोठे योगदान आहे. कारण या सर्वांचा राजमार्ग हा 'आयर्विन पूल' राहिला आहे. असा हा वास्तूकलेचा अद्भुत आविष्कार असणारा "आयर्विन" पूल 18 नोव्हेंबर 1929 मध्ये बांधून उभा राहिला. या पुलाला 92 वर्ष पूर्ण होत असून 93 व्या वर्षात पदार्पण करत आहे.

सांगली- कृष्णाकाठावर वसलेल्या सांगली नगरीला "आयर्विन" पूल हा ऐतिहासिक ठेवा म्हणून लाभला आहे. शहराच्या जडणघडण आणि ऐतिहासिक साक्षीदार असणाऱ्या आयर्विन पुलाला 92 वर्ष पूर्ण होत आहेत. वास्तूकलेचा अद्भूत आविष्कार असणारा आयर्विन पुल अनेक महापूरांना तोंड देत आजही मोठ्या दिमाखात सांगलीच्या वैभवामध्ये भर घालत आहे.

सांगलीच्या वैभवशाली 'आयर्विन पुला'ला 92 वर्षे पूर्ण

92 वर्षात "आयर्विन" करतोय पदार्पण -

कृष्णा नदी काठी वसलेल्या सांगली शहराची ओळख आज अनेक कारणांनी आहे. मग ती इथल्या हळद, द्राक्ष, नाट्य, साहित्य, कुस्ती, राजकारण असो किंवा अन्य गोष्टी. हे सर्व समृद्ध बनवण्यात सांगलीच्या कृष्णा नदीच्या बरोबर "आयर्विन" पुलाचेही मोठे योगदान आहे. कारण या सर्वांचा राजमार्ग हा 'आयर्विन पूल' राहिला आहे. असा हा वास्तूकलेचा अद्भुत आविष्कार असणारा "आयर्विन" पूल 18 नोव्हेंबर 1929 मध्ये बांधून उभा राहिला. या पुलाला 92 वर्ष पूर्ण होत असून 93 व्या वर्षात पदार्पण करत आहे.

व्हाया कोल्हापूर होत असे मुंबई-पुणे प्रवास -

1929 आधी सांगली शहराला पुणे, मुंबईकडे जाण्याचा मार्ग हा व्हाया कोल्हापूर असा होता. कारण कृष्णा नदीवर कोणताच पूल नव्हता. त्यामुळे सांगलीतुन मुंबई आणि पुणेकडे जायचे झाले तर कृष्णा नदी नावेतून जीव धोक्यात घालून पार करावी लागत असे. त्यामुळे बहुतांश सांगलीकरांचा प्रवास हा 1929 च्या आधी कोल्हापूर मार्गे होत असे.

महापूरामुळे आयर्विन पुलाचा जन्म -

कृष्णाकाठी वसलेल्या या शहराला 1914 मध्ये महापूराचा फटका बसला. त्यानंतर सांगलीचे संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांनी कृष्णा नदीवर पूल उभारण्याचा निर्णय घेतला. या बाबतीत त्यावेळच्या सांगली स्टेट असेंम्बली मध्ये चर्चा घडवून आणली आणि निधी जमवून या पूल उभारणीला 14 फेब्रुवारी 1927 मध्ये प्रत्यक्ष सुरूवात झाली. ब्रिटिश आधिपत्याखाली जरी या पुलाला मान्यता मिळाली असली तरी, याचे सर्व नियंत्रण हे तत्कालीन सांगली संस्थानचे पटवर्धन सरकारांच्या आधिपत्याखाली होते. तर या पुलाचे बांधकामाचे कंत्राट पुण्यातील रानडे ऍण्ड सन्स कंपनीकडे होता. सांगली शहरातील काळा दगड, कर्नाटकातील गोकाक येथील लाल दगड आणि शिसे याचा वापर करून हा पूल बांधण्यात आला. पूल उभारताना यावर रेखीव आणि देखण्या रुपाची हस्तकलाही करण्यात आली. 13 कमानींच्या जोरावर उभा राहिलेला हा भव्य दिव्य पुल, अखेर दोन वर्षांनी म्हणजे 18 नोव्हेंबर 1929 मध्ये सर्वार्थाने पूर्ण होऊन वाहतूकीसाठी खुला झाला. तर त्याकाळी या पुलाच्या निर्मितीसाठी 6 लाख 50 हजार रुपये इतका खर्च आला.

"आयर्विन"नाव कसे मिळाले -

या पुलाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झाले, ते भारताचे ब्रिटिश राजवटीतील गव्हर्नर एडवर्ड फ्रेडरिक लेंडीली वुड आणि त्यांना बॅरेन आयर्विन ऑफ कर्बी अंडरडेल ही पदवी होती. आणि या पदवीवरून सांगली संस्थानकडून या पुलाला "आयर्विन" हे नाव देण्यात आले. पटवर्धन संस्थानिकांनी मोठ्या थाटामाटात या पुलाचे उद्घाटन तत्कालीन गव्हर्नर एडवर्ड फ्रेडरिक लेंडीली वुड आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते केलं. आणि एडवर्ड फ्रेडरिक लेंडीली वुड यांच्या पत्नीने या सुंदर पुलाचे तोंड भरून कौतुक केल्याचा इतिहास आहे.

"आयर्विन" ठरला सांगलीच्या समृद्धीचा राजमार्ग -

आयर्विन पुलाच्या निर्माणामुळे खरंतर सांगलीच्या प्रगतीची मार्ग खुला झाला. पुलाच्या आधी याठिकाणी व्यापारास मर्यादा होत्या. पण आयर्विन पुलाच्या निर्मितीमुळे सांगलीकडे व्यापाराचा नवा मार्ग सुरू झाला आणि बघता बघता सांगली हे एक व्यापारी केंद्र बनले. सांगलीला एक समृद्ध शहर बनवण्याचा "आयर्विन" पूल हा राजमार्ग ठरला. आज मोठ्या दिमाखात सांगलीच्या वैभवात भर घालणाऱ्या या आयर्विन पुलाला 92 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 92 वर्षाच्या कालखंडात या पुलाने अनेक स्थितंतरे पहिली आहेत. इतकेच नव्हे तर अनेक महापूर पचवली आहेत. नुकत्याच 2019 व 2021 मध्ये आलेल्या भयानक महापुराला ही आयर्विन पुलाने तोंड दिले आहे, पण या महापूरात पुलाची थोडी वाताहत झाली आहे. पण वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत आलेल्या महापुरात कधीही हा पूल बुडाला नाही किंवा या पुलावरून पाणी गेले नाही. आणि असा हा आयर्विन पूल अनेक संकटे झेलत सांगलीच्या कृष्णाकाठी मोठ्या दिमाखाने उभा आहे.

ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा -

सांगलीच्या वैभवात भर घालणार आयर्विन पूल शहराच्या जडणघडणीचा साक्षीदार सुद्धा आहे.त्यामुळे शहराला समृद्ध करणाऱ्या "आयर्विन"पुलाला जतन करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.यासाठी या पुलावर वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी आयर्विन पुलाला समांतर पूल उभारण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details